अशोक खाडे-- कुंभोज--रहदारीने गजबजलेल्या लहान-मोठ्या रस्त्यांवर साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला की, ऊस वाहतूक सुरू होते. मर्यादेपेक्षा जास्त ऊस भरलेल्या ट्रॅॅक्टरची भरधाव ये-जा आणि दिवसागणिक ऊस वाहतुकीची वाहने पलटी होण्याच्या घटनांत जीवघेण्या अपघातांची संख्या वाढली आहे. सर्वच रस्त्यांवर सध्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची बेफिकिरी वाढल्याने पादचारी, सायकलस्वार, दुचाकी वाहनधारक, शाळकरी मुले भीतीच्या छायेत जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसून येतात. खचाखच ऊस भरून झोकांड्या घेत, कर्णकर्कश गाण्यांच्या तालावर बेफामपणे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचीच रस्त्यांवर दहशत निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.ऊस वाहतुकीसाठी बैलगाडी, टॅक्टर तसेच ट्रकचा वापर होतो. वाहनधारकाने किती ऊस भरावा याबाबत बंधन नसल्याने ऊस वाहतूकदार अतिरिक्त कमाईच्या आशेने १६ टनांपेक्षा २ ते ४ टन जादा उसाची वाहतूक करताना दिसतात. वाहनमालकाचा कमीतकमी खर्चात ऊस वाहतुकीद्वारे जादा कमाई करण्याचा प्रयत्न असतो. यामुळेच वाहनांची ये-जा करताना जणू शर्यत सुरू असते. या चढाओढीमुळे रस्त्यावरील प्रत्येकाचा प्रवास असुरक्षित बनला आहे.लहान-मोठ्या रस्त्यांवर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक यांची वर्दळ वाढली आहे. या वाहनांची बेफाम गती, अतिरिक्त ऊस भरणी, वाहनांसह त्यातील टेपरेकॉर्डरचा कर्णकर्कश आवाज यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीला बेशिस्तपणा आला आहे. त्यातच रस्त्यात ऊस गळणे, उसाचे ट्रॅक्टर पलटी होणे, अशा घटना नित्याच्या बनल्या आहेत. यामुळे विशेषत: पादचारी, सायकलस्वार, दुचाकीस्वार यांचा प्रवास असुरक्षित बनला आहे. शाळकरी मुले तर जीव मुठीत घेऊन शाळेच्या वाटेवरून ये-जा करतात. मुले शाळेहून घरी पोहोचेपर्यंत पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. अनेक गावे, तसेच शहरांबाहेरून बायपास रस्ते नसल्याने ऊस वाहतुकीची वाहने बिनदिक्कतपणे नागरी वस्तींतूनच ये-जा करतात. त्यामुळेच तर अपघातांची संख्या दिवसेंदिस वाढत चालली आहे. परिणामी याकाळात रस्ते वाहतूक सर्वांसाठीच असुरक्षित बनली आहे.
ऊस वाहतुकीमुळे रस्ते वाहतूक बनली असुरक्षित
By admin | Published: December 30, 2015 9:42 PM