दत्ता पाटील
म्हाकवेः म्हाकवे-आणूर रस्त्यावरील ओढ्याचे पाणी बाहेर पडून शेतात घुसल्याने म्हाकवे येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ओढ्याच्या पाण्याच्या अपुऱ्या विसर्ग नियोजनामुळे येथील शेतकऱ्यांना दरवर्षी फटका बसतो. गत महिन्यात म्हाकवे-कुरणी रस्त्याचे काम करण्यात आले. परंतु, उद्घाटनापूर्वीच या रस्त्याचा भराव वाहून गेला आहे.
याच मार्गावरील बानगे येथेही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हाकवे येथील ओढ्यावर दोन मोठे नळे घालण्याची, तर बानगे येथील ओढ्यावर कमानी पुलासह रस्त्याची उंची वाढविण्याची नागरिकांची मागणी होती. यासाठी बानगे ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन करत कामही बंद पाडले होते. मात्र, शासनाच्या धोरणानुसार काम करत असल्याचे सांगत ठेकेदाराने नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे म्हाकवेतील शिवाजी दादू पाटील, बाळासाहेब पाटील, विठ्ठल पाटील, दत्तात्रय पाटील या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर बानगेतील रस्त्यावर पूर्वीप्रमाणेच पाणी येऊन नागरिकांची गैरसोय झाली आहे.
अधिकाऱ्यांनी पावसाळ्यातच पाहणी करावी..
रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च होतो. मात्र, बहुधा अधिकारी प्रत्यक्ष पाहणीऐवजी कार्यालयात बसूनच सर्वे करतात. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात अधिकाऱ्यांनी तालुक्यातील संपूर्ण रस्त्याची पाहणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात रस्ते करताना कोणत्या पुलासह रस्त्याची उंची, कोठे संरक्षक भिंतीची गरज आहे याचा अंदाज येईल, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
म्हाकवे-आणूर ओढ्यानजीकचा रस्त्याचा भराव तुटून शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे.
छाया दत्तात्रय पाटील, म्हाकवे