कोल्हापूर : एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत शहरात ‘आयआरबी’ने केलेल्या ४९.९९ कि. मी. रस्त्यांच्या तपासणीचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केले आहे. मंडळाने चार अभियंत्यांच्या पथकाद्वारे हे काम पूर्ण केले असून, उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार नेमलेली तज्ज्ञांची समिती गुरुवारी (दि. २४) कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता आहे. या अहवालाच्या आधारे समिती आयआरबी कंपनीशी करारानुसार ठरलेल्या कामांपैकी झालेल्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी करून अंतिम अहवाल सादर करणार आहे.मंडळाने १० जुलैपासून २१ जुलैपर्यंत ‘रोड लेव्हल व बिटल्स सर्व्हे’ (सर्वंकष सर्वेक्षण) द्वारे संपूर्ण प्रकल्पाचा अहवाल पूर्ण झाला आहे. यामध्ये पदपथ, रस्त्यांची उंची (प्लिंथ लेव्हल), डांबरी व सिमेंटच्या रस्त्यांची समानता, दोन्ही बाजूंची रुंदी, दर्जा, आदी तपासणी स्थापत्यशास्त्राच्या निकषानुसार करण्यात आली. टोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रकल्पाची किंमत ठरवा ती भागविण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले आहे.या व्यतिरिक्त टोलविरोधी कृती समितीने उच्च न्यायालयाच्या माध्यमातून प्रकल्पाची झालेली कामे, अपूर्ण कामे, कराराच्या अटी व शर्ती यानुसार काम, प्रकल्पाची नेमकी किंमत, आदींबाबत माहिती मागितली आहे. मंत्रालय जळीत प्रकरणात कागदपत्रे जळाल्यानेच प्रकल्पांबाबत माहिती उपलब्ध नसल्याचे म्हणणे मंडळाने उच्च न्यायालयात मांडले होते. या सर्व घडामोडींमुळेच मंडळाने खात्यांतर्गत अभियंते वापरून प्रकल्पाची पडताळणी केली आहे. अहवालाचा अभ्यास करून समिती कंपनीने केलेल्या कामाचे मूल्यांकन निश्चित करणार आहे. शिल्लक राहिलेल्या कामांची यादी करणे व त्याची किंमत ठरविली जाणार आहे. आयआरबी व महापालिकेने परस्पराविरुद्ध उपस्थित केलेल्या प्रलंबित मुद्द्यांबाबत निर्णय घेण्यासाठी समितीच्या अहवालाचा फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)
रस्त्यांचे मूल्यांकन अखेर पूण
By admin | Published: July 22, 2014 11:37 PM