कोल्हापूर- जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून नागरिकांचे जगणे हैराण करून सोडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा आता दीडशे-दोनशे रोज कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने सर्वांचीच आता पाचावर धारण बसली आहे. नागरिक भयग्रस्त, चिंताग्रस्त आहेत. जिल्हा व आरोग्य यंत्रणाही कोरोनाची साथ रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; परंतु नागरिकांचे म्हणावे तेवढे सहकार्य मिळत नसल्याने राज्य सरकारनेच ‘विकेंड लॉकडाऊन’ जाहीर केला आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी रात्री आठ वाजता सुरू झाली.
शुक्रवारी दिवसभराची वाढलेली वर्दळ रात्री आठनंतर कमी व्हायला लागली. पोलीस आणि महानगरपालिकेची पथके रस्त्यावर उतरली तशी शहरातील दुकाने पटापट बंद व्हायला लागली. हातगाड्या, फेरीवाले, हॉटेल, रेस्टॉरंट, पेट्रोलपंप चालक यांनी आपले व्यवसाय बंद केले. रात्री दहा वाजेपर्यंत शहरातील सर्व रस्ते रिकामे झाले. निर्मनुष्य झाले.
शहरातील बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, ताराबाई रोड, महापालिका परिसर, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, स्टेशनरोड, ताराबाई पार्क, राजारामपुरी, मध्यवर्ती बसस्थानक, बागल चौक, पार्वती चित्रमंदिर, उमा टॉकीज आदी परिसरात नीरव शांतता निर्माण झाली. अधूनमधून काही मोटारसायकलस्वार, चारचाकी वाहने मात्र शहरात फिरत असल्याचे दिसत होते. औषध दुकाने मात्र रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
गतवर्षी पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली होती. प्रसंगी काठीचा प्रसाद दिला होता. त्यामुळे शुक्रवारी लॉकडाऊनची भीती कोल्हापूरकरांच्या मनात असल्याचे दिसून आले. रस्त्यावर फारसे पोलीस दिसले नाहीत. बिंदू चौक, मिरजकर तिकटी येथे मोजकेच पोलीस दिसले. शहरातील अन्य चौकात मात्र पोलिसांविनाच ओस पडले होते.
गतवर्षीच्या आठवणींना उजाळा -
गतवर्षी २२ मार्च रोजी अचानक लॉकडाऊन पुकारला गेला. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले. यावेळी मात्र पूर्वनियोजित लॉकडाऊन झाल्यामुळे नागरिकांची तशी गैरसोय झाली नाही. आवश्यक सामानाची खरेदी करता आली. ओस पडलेले निर्मनुष्य रस्ते, स्मशान शांतता, रस्त्यावर भटक्या श्वानांची वर्दळ यामुळे गतवर्षीच्या आठवणींना उजाळा मिळाला. सोमवारी सकाळी सात वाजता हा विकेंड लॉकडाऊन संपणार आहे.