कुरुंदवाड -
राज्याबरोबर जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने कर्नाटक सीमाभागातील नागरिकांनीही धास्ती घेतली आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील कर्नाटकात प्रवेश करणारे दानवाड, जुगूळ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर बोरगाव (पाच मैल), गणेशवाडी , कागवाड रस्त्यावर कर्नाटक पोलिसांनी चेक पोस्ट केल्याने कर्नाटक- महाराष्टातील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतीसह इतर कामानिमित्त रोज ये-जा करणाऱ्यांची गोची झाली आहे.
सध्या राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रशासनाने कडक लाॅकडाऊन जाहीर केले असले तरी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली रस्त्यावरील गर्दी कायम आहे.
या संसर्गाची धास्ती कर्नाटक राज्याने घेतली असून महाराष्टातून कर्नाटकात जाणारे रस्ते प्रवास व वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. शिरोळ तालुक्यातून गणेशवाडी, राजापूर, दानवाड, दत्तवाड, पाच मैल, शिवनाकवाडी या मार्गावरून कर्नाटक राज्यात प्रवेश करता येतो. मात्र, कर्नाटक प्रशासनाने हे मार्ग बंद केले आहेत. दानवाड दुधगंगा नदीवरील पुलाच्या पलीकडे एकसंबा हद्दीत तसेच राजापूर बंधाऱ्याच्या पलीकडे जुगूळ हद्दीत रस्ता उखरून व रस्त्यावर मोठी झाडे टाकून वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. तर गणेशवाडी -कागवाड, पाच मैल (बोरगाव), शिवनाकवाडी -बोरगाव रस्त्यावर कर्नाटक पोलिसांनी चेक पोस्ट उभारले असून सबळ कारणाशिवाय कर्नाटकात प्रवेश दिला जात नाही.
सीमाभागातील शेतकऱ्यांची दोन्ही राज्यांच्या हद्दीत शेती आहे. नोकरी, व्यवसाय, कामानिमित्त वर्दळ असते. मात्र, सीमाच प्रवासासाठी बंद केल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
फोटो - राजापूर (ता. शिरोळ) बंधाऱ्याच्या पलीकडे जुगूळ (ता. अथनी) हद्दीत जेसीबीच्या साहाय्याने रस्ता उकरून वाहतूक बंद करण्यात येत आहे.