कोल्हापूर : सूफी संगीत, शास्त्रीय गायन, भावगीत, भक्तिगीते अशा सप्तसुरांच्या तारा छेडत ‘कलर्स’ व लोकमत ‘सखी मंच’प्रस्तुत ‘सूर रायझिंग स्टार्सचे’ या गायन स्पर्धेची प्राथमिक फेरी शुक्रवारी पार पडली. या फेरीतील अंतिम १५ स्पर्धकांमध्ये आज, शनिवारी मुख्य स्पर्धा होणार आहे. नवोदित आणि हौशी गायक कलाकारांसाठी ‘रायझिंग स्टार’ ही मालिका कलर्स चॅनेलवर ४ फेबु्रवारीपासून दर शनिवारी व रविवारी रात्री नऊला प्रक्षेपित होणार आहे. यानिमित्ताने आयोजित ही स्पर्धा आज, शनिवारी दुपारी चार वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात रंगणार आहे. शुक्रवारी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या स्पर्धेला गायकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जवळपास दीडशेहून अधिक गायकांनी आपली गानकला सादर केली. तरुणाईला केवळ उडत्या चालीची गाणी आवडतात, अशी टीका होत असताना शुक्रवारी मात्र तरुणाईने शास्त्रीय संगीतातच आपले सूर आळविले. प्रौढांपेक्षा तरुणाईचा या शास्त्रीय संगीताकडे ओढा अधिक दिसला. वय वर्षे १८ ते अगदी बहात्तरीच्या आजोबांनी हिंदी-मराठी गाणी सादर केली. त्यातून १५ गायकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. त्यांच्यातच आज, शनिवारी मुख्य स्पर्धा रंगणार आहे. वेदा सोनुले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कलर्स चॅनेलवर येणाऱ्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, हा कार्यक्रम लाईव्ह दिसणार आहे. इतर शोसारखे परीक्षकांसमोर येऊन कलाकारांना सादरीकरण करायचे नसून, कलाकारांचा ‘लाईव्ह परफॉर्मन्स’ बघून प्रेक्षकांनी त्यांना मतदान करायचे आहे. मतदान करणारा चेहरा स्क्रीनवर झळकणार आहे.अतिशय आगळ्या-वेगळ्या अशा या कार्यक्रमाचे सेलिब्रिटी परीक्षक आहेत विख्यात गायक आणि संगीतकार शंकर महादेवन, गायिका मोनाली ठाकूर, अभिनेता आणि गायक दिलजित दोसांझ. प्रेक्षकांच्या आणि सेलिब्रेटी परीक्षकांच्या निर्णयावर ‘रायझिंग स्टार’ ठरणार आहे.
‘रायझिंग स्टार्स’चे सूर आज झंकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2017 12:35 AM