कोल्हापूर : नाराजीनाट्यानंतर स्वाभिमानीतील कार्यकर्ते नेत्यांनी एकमताने भरलेला हुंकार आणि त्याला राजू शेट्टी यांच्याकडून मिळालेल्या सकारात्मक होकारानंतर विधान परिषदेचे आमदार शेट्टीच होणार असल्याचे स्पष्ट झाले.
चार दिवसांपासून रंगलेल्या नाराजीनाट्याचा शेवट शुक्रवारी (दि. १९) रात्री गोड झाला. नाराज नेत्यांसह एकत्रित पोझ देऊन शेट्टी यांनीच आपण एकसंध असल्याचे आणि वाद राहिला नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर शनिवारी घोषणेची निव्वळ औपचारिकता उरली होती.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांना खुद्द शरद पवार यांनी बारामतीत घरी बोलावून राष्ट्रवादीतर्फे विधान परिषदेत राज्यपाल कोट्यातून निवडीसाठी शिफारस केल्याचे जाहीर केले. राजकीय व्यवहार समितीत ठरल्यानुसार शेट्टी यांनी पवार यांना होकार दिला; पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी संघटनेतील बिनीचे शिलेदार व शेट्टी यांचे विश्वासू साथीदार असलेले स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील व सावकर मादनाईक यांनी थेट नाराजी व्यक्त करीत उमेदवारीवर दावा केला.
यावरून दोन दिवसांपासून राज्यभर संघटनेच्या भवितव्यापासून ते शेट्टी यांच्या कार्यपद्धतीपर्यंत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. स्वत: शेट्टी यांनी या सर्वांमुळे आपण व्यथित झालो असल्याने आमदारकीची ब्याद नको अशी भूमिका जाहीर केली होती. यावरून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.शेट्टी यांनीच आमदारकी स्वीकारावी या कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे अखेर शुक्रवारी रात्री शेट्टी यांच्यासमवेत जयसिंगपूर येथे श्रीवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी सर्व नेत्यांची बैठक झाली. तासभर चाललेल्या या बैठकीत झालेले गैरसमज दूर करून एकमताने शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी प्रा. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, डॉ. महावीर अक्कोळे, पैलवान विठ्ठल मोरे, भाऊ साखरपे, जनार्दन पाटील, अजित पोवार, श्रीवर्धन पाटील उपस्थित होते.
राजकीय व्यवहार समितीने घेतलेल्या निर्णयानुसार मी राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेची आमदारकी स्वीकारणार आहे. एकमेकांसोबत झालेले किरकोळ गैरसमज दूर झाले आहेत. यावर सर्वांवर पडदा टाकला आहे. आता येथून पुढे एकदिलाने चळवळीत एकत्रितपणे काम करणार आहोत. सध्याच्या काळात वादापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे असल्याने त्यांना प्राधान्य आहे.- राजू शेट्टी,माजी खासदार, स्वाभिमानी