कोल्हापूर : रुईकर कॉलनीतील बंगल्यात बेडरूममध्ये कुटुंब झोपले असता, हॉलच्या खिडकीचे ग्रील वाकवून आत प्रवेश करून चोरट्यांनी २० तोळ्यांचे दागिने आणि मोपेड असा आठ लाख १८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. मंगळवारी (दि. १६) मध्यरात्रीनंतर एक ते चारच्या दरम्यान ही धाडशी चोरी झाली. याबाबत सूरज हिराप्पा सुतार (वय ३८, मूळ रा. महाडिक कॉलनी, कोल्हापूर, सध्या रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल व्यावसायिक सूरज सुतार हे रुईकर कॉलनीतील निरंजन वायचळ यांच्या सुलोचना बंगल्यात भाड्याने राहतात. मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास ते हॉटेलमधून घरी पोहोचले. नेहमीप्रमाणे बंगल्याचे गेट आणि मुख्य दरवाजा बंद करून पत्नी, मुलगी आणि भाच्यासह ते बेडरुममध्ये झोपले. मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास खिडकीचे ग्रील वाकवून दोन ते तीन चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. सुतार कुटुंबीय झोपलेल्या बेडरुमचा दरवाजा ओढून घेऊन दुस-या बेडरुममधील किमती ऐवजावर डल्ला मारला.
कपाटातील साहित्य विस्कटून गंठण, मंगळसूत्र, अंगठ्या, कर्णफुले, कानातील टॉप्स, हार असे २० तोळ्यांचे दागिने आणि चांदीचे पूजेचे साहित्य असा सुमारे आठ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. एकच्या सुमारास घरात शिरलेले चोरटे पहाटे चारच्या सुमारास बाहेर पडल्याचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून लक्षात आले. पार्किंगमधील मोपेड घेऊन त्यांनी पोबारा केला. बुधवारी (दि. १७) सकाळी सातच्या सुमारास उठल्यानंतर सुतार कुटुंबीयांना चोरीचा प्रकार लक्षात आला. शाहूपुरी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या दोन पथकांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.