लोकमत न्यूज नेटवर्क
बांबवडे : बांबवडे व डोणोली तालुका शाहूवाडी येथे झालेल्या चोरीत दोन लाख ९० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पोबारा केला. यामध्ये विरोध करणाऱ्या तिघांवर चोरट्यांनी चाकूहल्ला केला. त्यामध्ये ते किरकोळ जखमी झाले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, शाहूवाडीचे प्रभारी उपाधीक्षक आर. आर. पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री १ च्या दरम्यान डोणोली येथील लक्ष्मी आनंदा शेळके यांच्या घरात घुसून त्यांच्यावर चाकूहल्ला करून हातातील सोन्याच्या पाटल्या कटरने कट करून व पाकिटातील ७५० रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख २० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.यावेळी घरातील गोंधळ ऐकून जागे झालेल्या आनंदा दादू शेळके यांनी चोराला पकडले परंतु दुसऱ्या चोरांनी त्याच्या हातावर चाकूचा वार केला व चोर पळून गेले. त्यानंतर या चोरांनी डोणोली येथेच प्रदीप सुदाम पाटील व विजय शहाजी कांबळे यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला; परंतु घरातील लोक जागे झाल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे चोरांचा येथे चोरी करण्याचा प्रयत्न फसला . या घटनेनंतर रात्री २.३० च्या दरम्यान चोरांनी आपला मोर्चा बांबवडेकडे वळवला. येथे सरूड रोडवरील श्रीमती विजया महादेव पाटील या वृद्धेच्या घराचे दार उघडून तिच्यावर चाकूहल्ला केला व रोख रकमेसह एकूण १ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
या संपूर्ण घटनेने बांबवडे व डोणोली परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे विशेष पथक, सायबर पथक, श्वानपथक, फॉरेन्सिक लॅब पथक ही पथके चोरीचा छडा लावण्यासाठी तैनात झाली होती. पुढील तपास शाहूवाडी पोलीस करत आहेत
चौकट
सासऱ्यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला
डोणोली येथील लक्ष्मी आनंदा शेळके यांच्यावर एका चोराने व त्यांच्या सुनेवर दुसऱ्या चोराने झडप घातली होती. गोंधळ ऐकून जागे झालेल्या आनंदा शेळके यांनी सुनेवर हल्ला करणाऱ्या चोरास पकडले. तोपर्यंत दुसरा चोर उठून त्याने त्यांच्यावर चाकूहल्ला केला व पळून गेले.
फोटो १ डोणोली येथे जखमी झालेले लक्ष्मी शेळके व आनंदा शेळके .२.बांबवडे येथील जखमी, विजया पाटील.