कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील पहिले रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे रूग्णालय कोल्हापुरात उभारण्यात आले आहे. प्रसिध्द कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सूरज पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे ते बेंगलोर पट्ट्यातील हे एकमेव आणि देशातील पाचवे रूग्णालय असल्याचा दावा त्यांनी केला.डॉ. पवार म्हणाले, गेल्या ३० वर्षात शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान बदलत गेले. येणाऱ्या काळाची पावले ओळखून कोल्हापुरात जुन्या कॅन्सर हॉस्पिटलच्याच ठिकाणी माळी कॉलनी टाकाळा येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या रोबासर्ज या रूग्णालयामध्ये केवळ रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.यासाठी इंग्लंडस्थित सीएमआर या ख्यातनाम कंपनीने विकसित केलेले व्हर्सीयस हे रोबोट बसवण्यात आले आहेत.रोबोटिक सर्जरीमध्ये मुख्य सर्जन एका ठिकाणी बसून रोबोटच्या हातांचे नियंत्रण करतो. यावेळी समोरील स्क्रीनवर रूग्णाच्या शरीरातील अवयवांची ४० पट मोठी त्रिमितीय प्रतिमा त्यांना दिसू शकते. त्यामुळे शस्त्रक्रियेत अचूकता येते. रोबोटचा हात ३६० अंशात फिरू शकतो त्यामुळे शरीरातील अतिशय गुंतागुंतीच्या ठिकाणीही रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करता येते. या ठिकाणी ह्दय आणि मेंदूव्यतिरिक्त सर्व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. डॉ. दीपक पाटील, डॉ. मानसिंग आडनाईक, डॉ. बसवराज कडलगे, डॉ. प्रविण हेंदरे, डॉ. किरण बागुल, डॉ. हिमेश कॉनिया, डॉ. सुरेश देशपांडे, डॉ. मगदूम, डॉ. सौरभ गांधी या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. यावेळी डॉ. रेश्मा पवार, डॉ. संदीप पाटील उपस्थित होते.रोबोटिक शस्त्रक्रियेचे फायदे
- १ शस्त्रक्रियेमध्ये अचूकता
- २ एका छिदरावाटे शस्त्रक्रिया, त्यामुळे रक्तस्त्राव नाही
- ३ चिरफाड कमी, कमी वेदना
- ४ शरीरावर कमी व्रण राहतात
- ५ रूग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो.