कोल्हापूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेला रकमेचा दुसरा हप्ता खात्यावर जमा होण्यासाठी मागितलेल्या लाचेप्रकरणी पंचायत समिती, राधानगरी येथील कंत्राटी डाटा एंट्री आॅपरेटर साताप्पा कृष्णा चौगुले (वय ३२) याला लाचलुचपत विभागाच्या कोल्हापूर शाखेने ताब्यात घेतले.लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राहत्या घरी जनावरांचा गोठा बांधला आहे. त्या गोठा प्रकरणाकरिता शासनाकडून अनुदान रक्कम मंजूर होण्यासाठी पंचायत समितीकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केला होता. त्यानुसार ३५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून सात हजार २१० रुपये तक्रारदाराच्या बँक खात्यावर जमाही झाले.
अनुदानाची उर्वरित रक्कम बँकेच्या खात्यावर जमा झालेली नाही. ती बँक खात्यावर जमा करण्यासाठी पंचायत समिती, राधानगरी येथील लिपिक साताप्पा चौगुले व सुरेश कांबळे या दोघांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे फोनद्वारे २२ आॅक्टोबर २०१९ रोजी तोंडी तक्रार दिली होती. या तक्रारीची शासकीय पंच, साक्षीदारांसमक्ष पंचायत समिती, राधानगरी येथील लिपिक साताप्पा चौगुले व सुरेश कांबळे यांच्या लाच मागणीची पडताळणी केली.
त्या पडताळणीत लिपिक साताप्पा चौगुले यांनी तक्रारदाराकडे त्यांनी बांधलेल्या जनावरांचा गोठ्याच्या प्रकरणासाठी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचे बिल काढून देण्यासाठी लाच रक्कम संबंधित लिपिक सुरेश कांबळे यांना देण्यास सांगून लाच देण्यास प्रोत्साहन दिले असल्याचे पडताळणीच्या कारवाईत निष्पन्न झाले.
त्या अनुषंगाने गुरुवारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कक्ष, पंचायत समिती, राधानगरी येथून आरोपी लोकसेवक डाटा एंट्री आॅपरेटर साताप्पा चौगुले यांना ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई लाचलुचपत विभागाचे अधीक्षक (पुणे) राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण, कोल्हापूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, सहायक फौजदार शाम बुचडे, कर्मचारी शरद पोरे, नवनाथ कदम, आदी कर्मचाऱ्यांनी केली. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम राधानगरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.