कोल्हापूर : पूरग्रस्त भागातील विद्युत रोहित्रे (ट्रान्स्फॉर्मर) दुरुस्ती व विद्युत खांब उभारण्याचे काम २० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला. यावेळी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी बहुतांश काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण केले जाईल, असे सांगितले.महापुराने बाधित झालेल्या भागातील कृषिपंपांना वीजपुरवठा करणारी रोहित्रे (ट्रान्स्फॉर्मर), विद्युत खांब, विद्युत तारा, मीटर्स या संदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, बाबासाहेब देवकर, मारुती पाटील, ‘महावितरण’चे कार्यकारी अभियंता सागर मारुळकर, आदी प्रमुख उपस्थित होते.गतवेळच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसांत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांचे काम पूर्ण करण्याचे निर्देश ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्याबाबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. किती काम पूर्ण झाले, किती शिल्लक आहे, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली.राहिलेली रोहित्रे व विजेच्या खांबांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे एन. डी. पाटील यांनी सांगितले.पूरकाळात बंद असलेल्या कृषिपंपांचे वीज बिल आकारता येणार नाही; कारण तशी तरतूद असल्याचे प्रताप होगाडे यांनी निदर्शनास आणले.पूरभागातील कृषिपंपांसह मोटारी, विद्युत सामग्रीसंदर्भातील पंचनामे महावितरणच्या कार्यालयातच पडून असून, ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत, अशी मागणी विक्रांत पाटील-किणीकर यांनी केली.‘महावितरण’चे मारुळकर यांनी पूरभागातील रोहित्रे दुरुस्त करून बसविण्याचे व खांब उभारण्याचे काम बहुतांश पूर्ण झाल्याचे सांगितले. एकूण १६०२ पैकी १३६ रोहित्रांचे व २१०० पैकी ८४१ खांब बसविण्याचे काम शिल्लक असून, ते लवकरच पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.यावर जिल्हाधिकाऱ्यांनी रोहित्रे दुरुस्तीसह खांब बसविणे याबाबतचा अहवाल ‘महावितरण’तर्फे वरचेवर देण्यात यावा. तसेच पुरातील मोटारींच्या पंचनाम्याची स्थिती काय असून, त्याचा तालुकानिहाय आकडा कळवावा, सरकारकडे तो पाठविला जाईल, असे सांगितले.ऊसतोडणीचा अहवाल दररोज द्यापूरबाधित भागात शिरोळचा दत्त कारखाना वगळता इतर साखर कारखाने ऊसतोडणी करीत नसल्याचे किणीकर यांनी निदर्शनास आणून दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून साखर सहसंचालकांना त्याबाबत कळवावे असे सांगितले. तसेच उपस्थित साखर सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांना पूरबाधित क्षेत्रातील किती ऊसतोडणी केला व नियमित ऊस किती तोडला याचा दररोज अहवाल आपल्याला सादर करावा, असे निर्देश दिले. पुढील बैठक २३ डिसेंबरला होईल, असेही त्यांनी सांगितले.