इचलकरंजी : शहर व परिसरातील राजकीय परिस्थिती आणि पार्श्वभूमी लक्षात घेऊन कोणत्याही पक्षाची कुबडी किंवा पाठिंबा न घेता सध्या तरी ‘अकेला चलो रे’ अशीच भूमिका आवाडे गटाची असल्याचा बोलबाला आहे. शनिवारच्या कॉँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात कितीही दबाव येवो, पण कॉँग्रेस सोडली तरी ‘अपक्ष’ राहून कॉँग्रेसी तत्त्वेच जोपासावयाची, अशी भूमिका राहण्याची अपेक्षा आहे.साधारणत: १९५६-५७ पासून कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा सार्वजनिक जीवनातील राजकारणात प्रवेश झाला असला तरी त्यांचे गुरू माजी खासदार दत्ताजीराव कदम पक्के कॉँग्रेसशी एकनिष्ठ. त्यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, बेंदूर समितीचे नेतृत्व, नगरसेवक, नगराध्यक्ष, इचलकरंजी जनता सहकारी बॅँकेचे संस्थापक अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, खासदार अशी अनेक पदे आवाडेंनी भूषविली. पण त्या सर्वांना कॉँग्रेस पक्षाचेच माध्यम होते. तत्कालीन स्थानिक नेतेमंडळी बाबासाहेब खंजिरे, अनंतराव भिडे, बापूसाहेब मोरे, मल्हारपंत बावचकर, सदाशिवराव मुरदंडे यांच्या संगतीत आवाडे मोठे झाले तरी हे सर्व कॉँग्रेसवालेच होते.त्याच्यानंतर १९८५-८६ मध्ये प्रकाश आवाडे आमदार झाले, तेही कॉँग्रेसमधूनच. पुढे प्रकाश आवाडे कॉँग्रेसच्याच मंत्रिमंडळात मंत्री होते. तर त्यांच्या सुविद्य पत्नी किशोरी आवाडे यासुद्धा कॉँग्रेसच्याच उमेदवारीवर २००० ते २००७ अशी साडेसात वर्षे नगराध्यक्ष होत्या. तर त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांनी एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष ही दोन्ही पदे त्यांनी चार-चार वर्षे भोगली. तीन सूतगिरण्या, एक साखर कारखाना, टेक्स्टाईल पार्क, आदी सहकारी संस्थाही कॉँग्रेसच्याच माध्यमातून आवाडेंनी उभ्या केल्या. त्यामुळे आवाडेंच्या तीन पिढ्या कॉँग्रेसमध्ये राहिल्या आणि वाढल्या. परिणामी अन्य पक्षात प्रवेश करण्याची सूतरामही शक्यता नसल्याचे कॉँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)वेगळा ठसा असूनही डावलल्याची खंतगेल्या साठ वर्षांत आवाडेंचा सार्वजनिक क्षेत्रात असलेला वावर, राजकीय दबदबा, सहकार क्षेत्रात त्यांनी साधलेली प्रगती यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा वेगळा ठसा आहे. आवाडे पिता-पुत्र दोघेही मंत्री राहिले असल्याने त्यावेळी त्यांचा जिल्हाभर वावर राहिला. तत्कालीन विकासकामांची वेगळी ओळख असताना अलीकडील काळात मात्र जिल्ह्याच्या राजकारणातून पश्चिमेकडील मंडळींनी त्यांना बाजूला काढले, याचीच खंत आवाडे समर्थकांत आहे
आवाडे गटाची ‘अकेला चलो’ भूमिका
By admin | Published: April 19, 2016 11:59 PM