समीर देशपांडे ।कोल्हापूर : विविध राजकीय पक्षांमध्ये कार्यरत असणारे नेते कसे गुण्या-गोविंदाने एकत्र नांदतात, याचे उत्तम उदाहरण म्हणून ‘गोकुळ’कडे पाहावे लागेल. कॉँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले पी. एन. पाटील आणि सर्वपक्षीयांना आधार वाटत असलेले महादेवराव महाडिक यांनी या संघाचे नेतृत्व करताना हीच राजकीय विविधतेतील एकता जोपासल्याने याही विधानसभेमध्ये सर्व संचालक त्यांच्या-त्यांच्या तालुक्यांमध्ये सोयीची भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट आहे.
भाजप-शिवसेना युती होणार की नाही, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असताना ‘गोकुळ’चे चेअरमन रवींद्र आपटे हे कागल मतदारसंघात समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत राहतील; तर चंदगडमध्ये त्यांचे समर्थक उमेदवार युतीप्रणित उमेदवारामागे राहण्याची चिन्हे आहेत. राधानगरीमध्ये सध्या तरी आपटे हे अरुण डोंगळे यांच्या व्यासपीठावर दिसत आहेत.चंदगडमध्ये विद्यमान संचालक राजेश पाटील हे राष्ट्रवादी, कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे; तर विरोधात दुसरे संचालक दीपक पाटील सक्रिय असतील. गडहिंग्लजमध्ये स्वीकृत संचालक रामराजे कुपेकर भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांच्या आदेशानुसार काम करतील.
कागल तालुक्यातील रणजितसिंह पाटील हे भाजपमध्ये असल्याने आणि अंबरिशदेखील युती झाल्यास समरजित घाटगे यांच्यासोबत राहण्याची चिन्हे आहेत. राधानगरीमधून अरुण डोंगळेंनी स्वत:च निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असून, दुसरे संचालक पी. डी. धुंदरे कॉँग्रेस आघाडीचे काम करतील. भुदरगड तालुक्यातील संचालक धैर्यशील देसाई हे बंधू राहुल देसाई यांच्या भूमिकेसोबत राहतील; तर विलास कांबळे हे के. पी. पाटील यांच्यासमवेत राहणार आहेत.करवीर तालुक्यातील बाळासाहेब खाडे, उदय पाटील, विश्वास पाटील, सत्यजित पाटील हे चौघेही कॉँग्रेस आघाडीसोबत राहतील; तर आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पत्नी जयश्री या महाडिक यांच्या बाजूला राहतील.
शाहूवाडी तालुक्यात संचालिका अनुराधा पाटील या चिरंजीव शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांच्यासोबत राहणार, हे स्पष्ट असून पन्हाळा तालुक्यातून ज्येष्ठ संचालक अरुण नरके आणि विश्वास जाधव यांचीही ताकद पाटील यांच्यासोबतच राहण्याची शक्यता आहे. स्वीकृत उर्वरित दोन संचालक बाबा देसाई आणि अनिल यादव हे भाजपचेच असल्याने हे भाजपचे काम करणार, यात शंका नाही.
‘गोकुळ’च्या जाजमावर एकत्रएरव्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका आल्या की आपापल्या तालुक्यांत वेगवेगळी भूमिका घेणारे हे संचालक एकदा ताराबाई पार्कात किंवा गोकुळ शिरगावमध्ये आले की मग मात्र ‘गोकुळ’च्या जाजमावर एकत्र येतात, हा इतिहास आहे आणि हेच ‘गोकुळ’च्या कारभाराचे वैशिष्ट्य आहे.
महाडिकांवर पहिल्यांदाच बंधनमहादेवराव महाडिक जरी स्वत: भाजपमध्ये नसले तरी त्यांचे चिरंजीव अमल भाजपमधून पुन्हा निवडणूक लढविणार आहेत. त्यांचे पुतणे धनंजय महाडिक आता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यामुळेच त्यांना स्वत:ला प्रत्येक मतदारसंघांमध्ये वेगवेगळी भूमिका घेण्यावर निश्चितच मर्यादा येणार आहेत.
आगामी निवडणुकीचे राजकारणआगामी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत या सत्तारूढांविरोधात आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ आणि माजी खासदार राजू शेट्टी हे रान उठविणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्या दृष्टीने या तिघांच्या टोकदार विरोधाची भूमिकाच घेतली जाणार आहे.
चंदगडमधून राजेश पाटील, कागलमधून शिवसेनेकडून अंबरिश घाटगे आणि राधानगरीतून अरुण डोंगळे हे तिघे ‘गोकुळ’चे संचालक निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत.भाजप-शिवसेना युती झाली तर मात्र अंबरिश घाटगे यांना थांबावे लागेल. अरुण डोंगळे यांनी यावेळी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार, अशी घोषणा केली असून, त्यांच्या पक्षाविषयी मात्र औत्सुक्य आहे.