कोल्हापूर : राज्यातील साखर कारखानदारीपाठोपाठ सर्वांधिक रोजगार देणाऱ्या संस्था म्हणून सूत गिरण्यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या सूत गिरण्यांना मदत करण्याची आपली भूमिका राहिल, असे उच्च व तंत्र शिक्षण तसेच वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मागच्या सरकारच्या काळात माझ्याकडे वस्त्रोद्योग खात्याचा कार्यभार होता, त्यावेळी काही सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु त्यावेळी निर्णय घेता आले नव्हते. परंतु आता मात्र हे खाते आल्यामुळे या सूचना अंमलात आणण्याचा आपला प्रयत्न असेल, असे सांगून मंत्री पाटील म्हणाले की, साखर कारखान्यापाठोपाठ सर्वाधिक रोजगार देणाऱ्या सूत गिरण्यांना मदत करण्याची भूमिका राहिल. कापूस उत्पादन होतो तेंव्हा त्याची किंमत तुलनेने कमी असते. नंतर ती हळूहळू वाढत जाते. म्हणून सरकारने कापूस खरेदी करुन व्याज लावून तो गिरण्यांना दिला तर स्वस्त मिळू शकतो.
वीज परवडत नसल्याने गिरण्यांना सोलरवर नेता येईल का, काही सबसिडी देता येईल का याचाही विचार करावा लागणार आहे. सूत गिरण्यांकडे असणाऱ्या अतिरीक्त जमिनी त्यांना विकण्यास परवानगी देऊन येणाऱ्या पैशातूनही या गिरण्यांना मोठी आर्थिक मदत होईल. राज्य सरकारचाही काही प्रमाणात भांडवल देण्याचा प्रयत्न राहिल, असे पाटील म्हणाले.
नाराज होण्याचा प्रश्नच नाही -
मागच्या सरकारच्या काळात अनेक मोठी खाती मिळाली होती, पण यावेळी तुलनेने कमी असलेले उच्च व तंत्र शिक्षण खाते मिळाले असल्याने आपण नाराज आहात का असे विचारता मी नाराज होण्याचा प्रश्नच नाही, उलट पंतप्रधान मोदी यांच्या नवीन शैक्षिणक धोरणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. कोणतेही मंत्रीपद कमी महत्वाचे वा जास्त महत्वाचे नसते. तुम्ही त्या पदावर किती चांगले काम करता हे जास्त महत्वाचे असते, असे पाटील यांनी सांगितले.