कोल्हापूर : लिंगायतांची भूमिका ही स्पष्टपणे स्वतंत्र धर्माची असून, वीरशैवांची भूमिका मात्र हिंदूंचा संप्रदाय असल्याची आहे, असे कोल्हापूर लिंगायत समाजाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. सध्या लिंगायत व वीरशैव समाजांत जनगणनेवेळी धर्माच्या रकान्यात काय नोंद करावी, यावरून दरी निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट होण्यासाठी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, सामान्यत: असे मानले जाते की, लिंगायत आणि वीरशैव ही एकाच धर्माची दोन समानार्थी व पर्यायवाची नावे आहेत. या दोन्हींमध्ये काही भेद व भिन्नत्व नाही असेही म्हटले जाते. वरकरणी पाहता हे खरे वाटते; परंतु वस्तुस्थिती फारच वेगळी आहे. त्यामुळेच लिंगायत आणि वीरशैव यांच्यातील भेद समजावून घेणे गरजेचे आहे. लिंगायत हा पूर्ण अवैदिक धर्म आहे. वीरशैव हा संपूर्णत: वैदिक आहे. लिंगायत हा अनुभवप्रामाण्यता स्वीकारतो; तर वीरशैव वेदप्रामाण्यता. लिंगायताने कायमच वेदमाहात्म नाकारले आहे. त्याउलटी भूमिका वीरशैवची आहे. लिंगायतांची आचारविचारांची दिशा वचनप्रणित आहे. वीरशैवांची आचारविचारांची दिशा ही वैद व आगमप्रणित आहे. लिंगायतांना हिंदू विचार आणि आचार पद्धती पूर्णत: अमान्य आहे. वीरशैवांना ती मान्य आहे. लिंगायतांची सामान्य रचना बसवेश्वरप्रणित, तर वीरशैवांची पाच जगद्गुरुप्रणित आहे. लिंगायतांना विवाहातील वैदिक मंत्र मान्य नाहीत. वीरशैवांना ते मान्य आहेत. लिंगायतांनी विषमतावादी वर्ण आणि जातिव्यवस्था नाकारल्या आहेत. समतावादी व्यवस्थांचा कायमच प्रत्यक्ष पुरस्कार केला आहे. लिंगायतांच्या पीठपरंपरा, मठपरंपरा, मठाधीश निवड, अय्याचार संस्कार, तीर्थक्षेत्रे, धर्मध्वज व इतर बहुतेक परंपरा खूपच स्वतंत्र व भिन्न स्वरूपाच्या आहेत.