एकनाथ पाटीलकोल्हापूर : येथील पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस उद्यानात उभारण्यात आलेला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा व राज्यातील सर्वोच्च उंचीच्या राष्ट्रध्वजाची रोपवायर खराब होऊन रोलरचक्री तुटली आहे. त्यामुळे प्रजासत्ताकदिनी झेंडा फडकला नसल्याने कोल्हापूरवासीयांसह पर्यटकांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे.
राष्ट्रध्वजाची रोपवायर खराब होऊन रोलरचक्री तुटल्याने झेंडा फडकला नसल्याने पुण्यातील बजाज इलेक्ट्रिक कंपनीच्या तज्ज्ञांकडून दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. नेहमी थाटामाटात फडकणारा झेंडा गेल्या महिन्याभरापासून ध्वजस्तंभावर नसल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोल्हापूरला येणारे पर्यटक पोलिसांचे उद्यान पाहून भारावून जातील, अशी रचना करणारा आराखडा तयार करून उद्यान बनविण्यात आले आहे. उद्यानात देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ३०३ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे.
उद्यान व ध्वजस्तंभासाठी सुमारे एक कोटी खर्च आला आहे. २९ एप्रिल २०१७ रोजी त्याचे अनावरण व उद्यानाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रपती पुरस्कार विजेता बॉलिवूड अभिनेता ‘रुस्तम’ अक्षय कुमार यांच्या हस्ते राजेशाही थाटात झाले. गेली दोन वर्षे हा झेंडा दर शनिवारी आणि रविवारी थाटामाटात फडकत होता.
पावसाळ्यामध्ये चार महिने बंद ठेवला जातो; परंतु गेल्या महिन्याभरापासून ध्वजस्तंभावरील झेंडाच गायब झाला आहे. या ध्वजस्तंभाच्या मार्गावर मोठी वर्दळ असल्याने अनेकजण ध्वजस्तंभावर तिरंगा दिसत नसल्याने गोंधळून जात आहेत. या ध्वजस्तंभाची देखभाल दुरुस्ती केएसबीपी या कंपनीकडे आहे.झेंड्यामागचे गूढझेंडा गायब होण्याचे गूढ शोधले असता ध्वजस्तंभावरील रोलरचक्री तुटली आहे. त्यामुळे झेंडा वर-खाली घेता येत नाही. त्याचा रोप फिरत नसल्याने झेंडा फडकविता येत नसल्याचे सांगण्यात आले.
या ध्वजस्तंभाचा महिना ७० हजार रुपये दुरुस्ती खर्च आहे. पुण्यातील बजाज इलेक्ट्रिक कंपनीने ध्वजस्तंभाच्या रोलरचक्रीसह अन्य साहित्याची दहा ते बारा वर्षे गॅरंटी दिली आहे. तसा करारही झाला आहे. असे असताना दोन वर्षातच रोलरचक्री तुटल्याने ध्वजस्तंभाच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे.
केएसबीपीकडे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असल्याने त्यांनी बजाज कंपनीच्या तज्ज्ञांना कोल्हापूरला बोलावून गेल्या पंधरा दिवसांपासून रोलरचक्री दुरुस्ती व बदलण्याचे काम सुरू आहे. या तज्ज्ञांना फारशे यश आलेले नाही. त्यामुळे प्रजास्ताकदिनी राष्ट्रध्वज फडकला नसल्याची पहिलीच वेळ आहे.
ध्वजस्तंभावरील रोलरचक्री तुटली आहे. त्यामुळे तिरंगा ध्वज फडकविता येत नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून तज्ज्ञांकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रजास्ताकदिनी तिरंगा ध्वज तांत्रिक अडचणीमुळे फडकविला जाणार नाही, असा सूचना फलक उद्यानात लावला आहे.- सुजय पित्रे, अध्यक्ष, केएसबीपी
तांत्रिक अडचणीमुळे ध्वजस्तंभावरील झेंडा फडकविलेला नाही. त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या आहेत.डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक