कोल्हापूर : संभाजीनगरातील जुने एनसीसी ऑफिसनजीक खुल्या जागेवरील एका जुनाट खोलीचा गुन्हेगारी वृत्तीच्या युवकांकडून चरस, गांजा, मद्य प्राशन आणि अनैतिक कृत्यासाठी वापर केला जात होता. नशेतील युवकांचा परिसरातील नागरिकांना त्रास होत होता. या त्रासाला कंटाळलेल्या स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन संबंधित युवकांना बेदम चोप देत खोलीचे बांधकाम जमीनदोस्त केले.
संभाजीनगर रेसकोर्स परिसरातील जुने एनसीसी ऑफिसनजीक खुल्या जागेत पूर्वी वॉचमनसाठी एक खोली बांधण्यात आली होती; पण या खोलीचा काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांकडून गेली काही वर्षे चरस, गांजा, मद्य प्राशन आणि अनैतिक कृत्यासाठी दिवसभर वापर केला जात होता. या नशेतील युवकांचा या परिसरात दिवसभर धुमाकूळ सुरू असायचा, त्यामुळे रोज येथे त्यांची स्थानिक नागरिकांशी वादावादी होत होती. त्यांच्या गुंडगिरीमुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत होता. पोलीस आल्यावर हे नशेतील गुंड खुल्या मैदानातून पसार होत होते. या गुंडांच्या त्रासाला कंटाळून स्थानिक महिला व नागरिकांनी मंगळवारी सायंकाळी काही नशेतील युवकांना बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. बुधवारी सायंकाळी परिसरातील नागरिक माजी नगरसेवक किरण नकाते, माधुरी नकाते यांच्या पुढाकाराने एकत्र आले. त्यांनी हातात पहार, लोखंडी घन घेऊन संबंधित खोलीचे बांधकाम जमीनदोस्त केले.
नशेबाजांना पिटाळले
खोलीचे बांधकाम पाडताना नेहमी नशेसाठी येणारे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक त्या ठिकाणी आले. त्यांना संतप्त नागरिकांनी एकत्र येऊन पिटाळून लावले. यापुढे व्यसनी आणि गुन्हेगारी वृत्तीच्या युवकांनी स्थानिक नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना महिलांकडून चोप देऊन त्याची धिंड काढली जाईल, असा इशारा माजी नगरसेविका माधुरी नकाते यांनी यावेळी दिला.
फोटो नं. ०७०७२०२१-कोल-संभाजीनगर०१,०२
ओळ : कोल्हापूर शहरातील संभाजीनगर जुने एनसीसी ऑफिस परिसरातील खुल्या जागेत गुन्हेगारांकडून नशापान करण्यासाठी वापरणारी खोली संतप्त स्थानिक नागरिकांनी बुधवारी सायंकाळी जमीनदोस्त केली.
फोटो नं. ०७०७२०२१-कोल-संभाजीनगर०३
ओळ : संबंधित खोलीत नशेचे साहित्य विखुरले होते.