आदर्की : फलटण पश्चिम भागात बागायती क्षेत्र वाढले असले, तरी भाजीपाला पिकाला हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत येत आहे. असेच बिबी येथील शेतकऱ्याने मेथीच्या भाजीला दर नसल्याने एक एकरातील मेथीच्या भाजीवर रोटावेटर फिरवला आहे.फलटण पश्चिम भागात धोम-बलकवडीचे पाणी आल्याने बागायती क्षेत्र वाढले आहे. पाण्याची उपलब्धता पाहून शेतकऱ्यांनी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली; पण साखर कारखानदारांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी उसाला पर्याय म्हणून भाजीपाला क्षेत्राकडे वळला आहे. पण भाजीपाला पिकास हमीभाव नसल्याने कधी सोन्याचा भाव, तर कधी अगदीच अल्प किंमत येत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
बिबी (ता. फलटण) येथील शेतकरी चंद्रकांत बोबडे यांनी जून महिन्यात कांद्याची लागवड केली. परंतु कांदा काढतेवेळी अतिवृष्टी झाल्याने कांदा पिकात पाणी साचून नुकसान झाले. त्याच शेतात गत महिन्यापूर्वी ३० किलो मेथीचे बी टाकून, पाण्याच्या दोन पाळ्या दिल्या.
मेथीच्या पेंडीला तीन रुपये दर व्यापारी सांगत होते, तर मेथीची भाजी काढणे, बांधणी, वाहतूक याचा खर्च तीन रुपये व मेथीचे बी, मशागत, खते वेगळा खर्च होतो. त्यामुळे मेथीची भाजी विकणे परवडत नसल्याने त्यांनी उभ्या पिकात ट्रॅक्टरच्या साह्याने रोटावेटर मारून जमिनीत गाडली आहे.कोणतीही भाजी दोन ते तीन रुपये पेंडी...बाजारात भाजीपाल्याला दर असला तरी, शेतकऱ्याकडून दोन ते तीन रुपये पेंडी या दराने भाजीपाला घेतला जातो. नवीन बटाटा -१८ रु. किलो, टॉमेटो -१० रु., कोबी १० रु. गड्डा, फ्लॉवर १० रु. गड्डा, मिरची ४० रु., पावटा ३० रु., वालघेवडा २० रु. किलो असा दर आहे.
जुलै महिन्यात लाल कांद्याची पेरणी केली. भांगलण, खते, औषधे यावर खर्च करून पीक चांगले आले; त्यावेळी दरही चांगला होता; पण चार दिवस सलग अतिवृष्टी होऊन कांदा शेतातच नासला. त्यानंतर तीस किलो मेथी बी टाकले. त्यावेळी पंधरा रुपये पेंडी दर होता. आता काढतेवेळी तीन रुपये पेंडी असा दर झाल्याने मेथीवर रोटावेटर फिरवला आहे.- चंद्रकांत बोबडे,बिबी, ता. फलटण