कोल्हापूर : वागा तोर (गोवा) येथे झालेल्या रॉयल एन्फिल्ड रायडर मेनिया स्पर्धेत कोल्हापूरच्या रॉयल रायडर्स बुलेट क्लबच्या खेळाडूंनी विविध सीसी गटात आठ पदकांची कमाई करीत स्पर्धेत बाजी मारली.
या स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला स्पर्धकांसाठी ३५० सीसी, हिमालयन आणि ५०० सीसी या प्रकारांमध्ये शर्यती झाल्या. शर्यतींबरोबरच हिल क्लाइंब, मोटोबॉल, रिंगटॉस, स्लो रेस अशा इतर अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये रॉयल रायडर्सचे स्पर्धक गेल्या सहा वर्षांपासून या शर्यतींमध्ये आहेत.
या वर्षीसुद्धा या स्पर्धकांनी शर्यतींमध्ये आठ पदकांची कमाई केली. या शर्यतींमध्ये सुरुवातीच्या रेषेपासून पहिल्या वळणावर सर्वप्रथम पोहोचणे अत्यंत अवघड मानले जात होते. हे वळण सर्वप्रथम घेणाऱ्या स्पर्धकाला ‘होलशॉट’ पदक दिले जाते. यावर्षी या स्पर्धकांनी एकूण चार होलशॉट पदके खेचून आणली आहेत.
विशेषत: क्लबच्या सोळा वर्षांच्या सुहानी पाटील हिने गेल्या महिन्यात टीव्हीएस मोटोसोल स्पर्धेत केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करीत, महिलांच्या ३५० सीसी गटात प्रथम आणि ५०० सीसी गटात द्वितीय पारितोषिक मिळविले आहे. तिने ३५० सीसीत होलशॉट पदकासह प्रथम, ५०० सीसीत द्वितीय; गौरव पाटील याने ३५० सीसी पुरुष एक्स्पर्ट गटात व हिल क्लाइंबमध्ये द्वितीय, बाळकृष्ण आडके ५०० सीसीत पुरुष नोव्हीस गटात द्वितीय क्रमांक व होलशॉट पदकही पटकाविले.
महेश चौगुले याने ५०० सीसीत, तर अक्षय जाधव याने ३५० सीसीत होलशॉट पदक मिळविले. क्लबचे ज्येष्ठ सदस्य सचिन घोरपडे व अमृत दुधाणे, पार्थ अथणे यांनी विविध शर्यतींमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. या खेळाडूंना अमोल माळी, संजीव घोरपडे, क्लबचे अध्यक्ष जयदीप पवार, अभिजित काशीद, आदींचे सहकार्य लाभले.