कोल्हापूर : छत्रपती घराण्याच्या वतीने बुधवारी टाऊन हॉल उद्याननजीक नर्सरी बागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक मंदिरात शाही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाहू छत्रपती आणि यौवराज यशराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मकाळ उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ‘जय भवानी - जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.छत्रपती ट्रस्टच्या मालकीच्या नर्सरी बागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक मंदिर आहे. नेहमीप्रमाणे येथेही छत्रपती घराण्याच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येते. सकाळी भवानी मंडप येथे जुना राजवाडा येथून भालदार, चोपदार यांचा लवाजमा नित्यनियमानुसार आला. त्याचवेळी न्यू पॅलेसवरून रीतिरिवाजाप्रमाणे शाहू छत्रपती व यौवराज यशराजे हे सकाळी नर्सरी बागेत पोहोचले.
परिसरात उभारलेल्या राजेशाही शामियान्यात ललकारी, स्थानापन्न कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी काहीवेळ ऐतिहासिक पोवाडा, शाहू संगीत विद्यालयातील विद्यार्थिनींची गाणी ऐकली. त्यानंतर शाहू छत्रपती आणि यौवराज यशराजे यांनी मंदिरात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून फुलांनी सजविलेल्या चांदीच्या पाळण्याची पूजाही केली. जन्मोत्सवानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा देण्यात आल्या.शाहू छत्रपती, यौवराज यशराज यांनी एकत्रित मिळून राजर्षी शाहू समाधी स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. या कार्यक्रमासाठी नील पंडित-बावडेकर, बंटी यादव, बाबा चव्हाण, ट्रस्टी राजेंद्र चव्हाण, प्रवीण इंगळे, प्रसन्ना मोहिते तसेच शाहू संगीत विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संस्थेने उपस्थित होते.