प्रशांत कोडणीकर ल्ल नृसिंहवाडी नृसिंहवाडी येथे आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या कन्यागत महापर्व सोहळ्याकरिता १२१ कोटी ६४ लाखांच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याप्रमाणे दर १२ वर्षांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे होणाऱ्या कन्यागत महापर्वकाल सोहळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक दत्त दर्शन व शुक्लतीर्थ स्नान व धार्मिक विधीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सोयी, सुविधा व सुरक्षिततेसाठी हा निधी मंजूर केला आहे. मंगळवारी दुपारी मंत्रालयाच्या मुख्यमंत्री समिती कक्षात झालेल्या बैठकीत सुरुवातीला आमदार सुरेश हाळवणकर व उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांनी या महापर्वकालाबाबत तयार केलेली माहिती सादर केली. यानंतर पूर्ण प्रस्तावावर आधारित खातेनिहाय माहिती सादर करण्यात आली. यावर या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रस्ताव व कन्यागत महापर्वकालासाठी भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेसाठी सादर केलेला १२१.६४ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केल्याचे जाहीर केले. याशिवाय कुरुंदवाड घाट सुशोभीकरणासाठी ३.४० कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार उल्हास पाटील, सुरेश हाळवणकर, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक, सुरेश खाडे, दत्त देव संस्थानचे अध्यक्ष शशिकांत बड्डपुजारी, सचिव राजेश खोंबारे, उपसरपंच धनाजीराव जगदाळे, सदस्य अशोक पुजारी, जिल्हाधिकारी अमित सैनी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा नियोजन विकास समितीचे भूषण देशपांडे, दत्त देव संस्थानचे सचिव राजेश खोंबारे, विश्वास दामोदर, गोपाळ संत पुजारी, नृसिंहवाडीचे माजी उपसरपंच अभिजित जगदाळे, विविध खात्यांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
कन्यागत महापर्वासाठी १२२ कोटी रुपये मंजूर
By admin | Published: February 03, 2016 12:54 AM