कोल्हापूर : निसर्गाच्या आणि नशिबाच्या अवकृपेमुळे वेदनांचे आयुष्य पदरी पडलेल्या शहरातील कुष्ठरोगी बांधवांना त्यांच्या मानधनात ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी प्रति महिना १००० रुपये मानधन मिळत होते, ते आता महापालिकेच्या निर्णयामुळे १५०० रुपये होईल. शहरातील सुमारे १०० हून अधिक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.समाजातील निराधार, विधवा, दिव्यांग यांना उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारकडून प्रतिमहिना ६०० ते ९०० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. त्याच धर्तीवर कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत शहरातील कुष्ठरोगी बांधवांना औषध आणि पोषणाची जबाबदारी म्हणून एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सन २०१४ मध्ये घेतला होता. परंतु, ही रक्कम सध्याच्या महागाईच्या काळात कमी असल्याने ती वाढवून १५०० रुपये करावी, अशी मागणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी मागच्या महासभेत केली होती. तसा ठरावदेखील करण्यात आला.
आयुक्त अभिजित चौधरी यांनी एक हजार रुपयांप्रमाणेच अनुदान देण्यास सहमती दर्शविली होती. मात्र, शेटे यांच्या आग्रहानुसार उपसूचनेसह महासभेच्या मान्यतेनंतर प्रस्ताव प्रशासनाकडे अंमलबजावणीकरिता पाठविला होता.आयुक्त चौधरी यांनी सोमवारी या उपसूचनेसह मंजूर झालेल्या प्रस्तावावर सही केली. त्यामुळे १५०० रुपये अनुदान मिळण्यातील अडचण दूर झाली. त्याची अंमलबजावणी आता तातडीने होईल. औषध व पोषणाचा खर्च म्हणून देण्यात येणारी ही रक्कम थेट कुष्ठरोगी बांधवांच्या बॅँक खात्यावर जमा केली जाणार आहे.