मुंबई - कोल्हापूर,सांगली, सातारा भागातील आलेल्या पुरामुळे अनेक लोकांचे जनजीवन उद्ध्वस्त झाले. अनेकांचे संसार उघड्यावर पडल्याने या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. भाजपाचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडूनही पूरग्रस्तांसाठी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
छ. संभाजी महाराज यांनी महापुराने प्रभावित झालेल्या क्षेत्रात ही मदत खर्च करण्याचा संकल्प केला आहे. संभाजी महाराजांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, माझ्या निधीतून 5 कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. मला हे माहिती आहे, की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच कोल्हापूर, सांगली पूरग्रस्त लोकांना देण्यात येणाऱ्या मदतीवर माझा फोटो लावू नका, जे काही द्यायचं आहे ते निस्वार्थ भावनेनं द्या असं आवाहन छत्रपती संभाजी महाराज यांनी केलं आहे.
पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील पूरग्रस्त भागातील ४ लाख ६६ हजार ९६३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या नागरिकांसाठी ४४१ तात्पुरता निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ३३ पथकांसह आर्मी, नौदल, तटरक्षक दलाची एकूण १११ बचाव पथके कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी वैद्यकीय सेवा कार्यरत असल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.
पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये १०५ बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ५४ तर सांगली जिल्ह्यात ५१ पथकांचा समावेश आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहेत.
पूरग्रस्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील बारा बाधित तालुक्यातील २ लाख ४७ हजार ६७८ तर सांगली शहरासह जिल्ह्यातील चार बाधित तालुक्यातील १ लाख ७३ हजार ८९ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २०८ तर सांगली जिल्ह्यात १०८ तात्पुरता निवारा केंद्र सुरु करण्यात आली आहेत.