गडहिंग्लज : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मिरचीचे सौदे झाले. आजरा तालुक्यातील सुळे येथील सुमन इंद्रजीत कोकितकर यांच्या जवारी मिरचीला प्रति क्विंटल १ लाख तर प्रतिकिलो १ हजार रूपये उच्चांकी दर मिळाला.
येथील एस. एस. मोर्ती यांच्या श्रद्धा ट्रेडींग कंपनी या दुकानात हे सौदे झाले. जब्बार ब्रदर्स यांनी ही मिरची खरेदी केली. यावेळी व्यापारी भरत शहा, व्ही. के. चौथे, सलीम पाटील, अरविंद आजरी, श्रीकांत येरटे, राजन जाधव, शिवानंद मुसळे, रोहित मांडेकर, महेश मोर्ती, अमर मोर्ती, कयूम बागवाग, संजय खोत, लक्ष्मण पाटील, विरेंद्र नेवडे, सागर खमलेट्टी आदींसह बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
गडहिंग्लजची जवारी मिरची ‘संकेश्वरी मिरची’ नावाने ओळखली जाते. नोव्हेंबर आणि डिसेंबर हा काळ जवारी मिरची उत्पादनाचा असल्यामुळे या काळात वर्षाच्या सरासरीत ५० टक्के आवक होते. मिरची उत्पादक शेतकरी सौद्यात आणून मिरची विकतो. त्यामुळे बाजारपेठेची उलाढाल तेजीत चालते. अडत व्यापाऱ्यांकडून मिरची घेऊन रविवारच्या बाजारात छोट्या व्यापाऱ्यांकडून होणारी विक्रीही मोठ्या प्रमाणात असते.
कर्नाटकातून येणारी ब्याडगी मिरची गडहिंग्लजच्या बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. याशिवाय गरुडा, गोटूर, रालेज, शीतल, तेजा, ज्वाला अशा विविध जातीच्या मिरच्या गडहिंग्लज बाजारपेठेत सौद्याला येतात. ऑक्टोबरपासून गडहिंग्लजच्या स्थानिक मिरचीचा सौदा जोरात सुरू होतो. फेब्रुवारीनंतर कर्नाटकातून येणारी मिरची ग्राहकांचे लक्ष वेधून घेते.
माद्याळ (ता. कागल), माद्याळ (ता. गडहिंग्लज), सुळे व आरदाळ (ता. आजरा), बसर्गे, हेब्बाळ, निलजी, हसूरचंपू, हरळी, हिटणी, महागाव, येणेचवंडी या भागातून जवारी मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जवारी मिरचीला योग्य गुणधर्म इथल्या मातीत आढळतात. मध्यम व खोल निचरा होणारी जमीन मिरचीला उपयुक्त ठरत असल्याने इथे मिरचीचे उत्पादन चांगल होते. जवारी मिरचीला एक विशिष्ट चव असल्याने कोकण, मुंबई, पुणे व कोल्हापुरातून या मिरचीला जास्त मागणी आहे.