कोल्हापूर - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस आघाडीचे घटक असतील. त्यांनी कुणाशी आघाडी करावी हा त्यांचा प्रश्न असून काँग्रेसच्या व्यासपीठावर मात्र एमआयएमला स्थान नसेल असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी (14 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सध्या देशात सर्वच पातळीवर प्रचंड अस्वस्थता असून त्याचा फटका बसेल म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आगामी निवडणुकीत पंतप्रधान पदाचा उमेदवार ही बदलू शकेल अशी शक्यता ही चव्हाण यांनी व्यक्त केली.
राज्यातील दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचे जागावाटप पूर्ण होत आले आहे. 5 ते 6 जागांचा तिढा आहे. पण त्यात फारशी अडचण नाही. मनसे बद्धल चर्चा असली तरी तो पक्ष काँग्रेस आघाडीचा घटक असणार नाही असेही त्यांनी सांगून टाकले. यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी.एन.पाटील, सुरेश कुराडे आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "नोटाबंदी, राफेल करारावरून सुरू असलेली टीका, आरबीआय आणि सीबीआयमधील वाद आणि कोलंडलेली अर्थव्यवस्था यामुळे देशात सगळीकडे अस्वस्थता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चुकीची धोरणे त्यास कारणीभूत आहेत त्यामुळे देशपातळीवरील चेहरा बदलल्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पर्याय नसेल."