ज्योतीप्रसाद सावंत --आजरा येथे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा (आरटीओ) कॅम्पच होत नसल्याने अनेक तरुणांची इच्छा असूनसुद्धा ड्रायव्हिंग लायसन काढण्याची सुविधाच नसल्याने बहुतांशी तरुण हे परवान्याशिवाय वाहने चालविताना दिसतात. आजरा येथे किमान दोन महिन्यांतून एकदा आरटीओ कॅम्प घेण्याची मागणी होत आहे.गडहिंग्लज येथे महिनाभरातून एकदा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दुचाकी-चारचाकीसह अवजड वाहने चालविण्याचे परवाने देण्याची व्यवस्था आहे. याठिकाणी गडहिंग्लज-आजऱ्यासह ठिकठिकाणची मंडळी कच्चे व पक्के परवाने काढण्यासाठी गर्दी करताना दिसतात. ही गर्दी इतकी प्रचंड असते की गर्दी पाहूनच अनेकजण परवाने काढण्यापूर्वी परतताना दिसतात.एकीकडे वाहतूक पोलिसांकडून परवान्याची सक्ती केली जाते, तर दुसरीकडे परवान्यासाठी दिवस वाया घालवूनही परवाना मिळेल, याची खात्री देता येत नाही. याचा परिणाम म्हणून इच्छा असूनही अनेकांना परवाने काढता येत नाहीत. आजरा येथे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कॅम्प सुरू केल्यास वाहन चालविण्याच्या परवान्यांमध्ये निश्चितच वाढ होईल. अपघातांमध्येही घट होईल.रक्तदान शिबिराप्रमाणे सेवाभावी संस्था, तरुण मंडळे यांच्या माध्यमातून आरटीओ कॅम्प आजरा येथे घेण्याची गरज आहे.लोकप्रतिनिधींकडून आरटीओ कॅम्प सुरू होण्यासंदर्भात प्रयत्न करण्याची गरज आहे.कॅम्पसाठी प्रयत्न करणार : शिंत्रे एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना दुसरीकडे वाहन चालविण्याचा परवानाच काढणे अडचणीचे ठरत असल्याने परिवहनमंत्र्यांच्या माध्यमातून आजरा येथे आरटीओ कॅम्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रा. सुनील शिंत्रे यांनी सांगितले.
आरटीओ कॅम्पची आजऱ्यात मागणी
By admin | Published: October 12, 2015 11:40 PM