कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन विभागाचा कागल सीमा तपासणी नाका बंदच्या लढ्याला कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनला यश आले. राज्यातील बीओटी तत्त्वासहित सर्व आरटीओ सीमा तपासणी नाके येत्या १५ एप्रिल, २०२५ पासून बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जाहीर केले. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या असोसिएशनच्या लढ्याला यश आले.देशात २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर देशातील सर्व आरटीओ सीमा तपासणी नाके बंद केले जातील, अशी घोषणा केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केली होती. त्यांच्या आदेशानुसार १८ राज्यांतील आरटीओ सीमा तपासणी नाके बंद झाले. मात्र, महाराष्ट्रासह इतर राज्यांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली. त्यासंदर्भात जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनने लढा दिला.बीओटी तत्त्वावर कागल येथील सीमा तपासणी नाका १ एप्रिल २०२३ ला सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, असोसिएशनने ५०० वाहनांसह मोर्चा काढल्याने दोन वर्षे हा नाका सुरू झाला नाही. तो पुन्हा १० डिसेंबर २०२४ ला जबरदस्तीने सुरू करण्याचा घाट रचला होता. तपासणी नाक्यावरील आंदोलनापूर्वीच लॉरी ऑपरेटरच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर वाहतूकदारांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला.
कागल तपासणी नाका घटनाक्रम
- १ एप्रिल २०२३ : तपासणी नाका सुरू करण्याचे नियोजन
- ३० मार्च २०२३ : ५०० वाहनधारकांचे आंदोलन
- १ एप्रिल २०२३ ते ९ डिसेंबर २०२४ : दोन वर्षे नाका बंद
- १० डिसेंबर २०२४ : पुन्हा तपासणी नाका सुरू
- २ मार्च २०२५ : टोल नाका बंदची घोषणा
गेल्या सात वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाले. प्रामाणिकपणे कष्ट करून व्यवसाय करणाऱ्या वाहतूकदारांचा हा विजय झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला. - सुभाष जाधव, अध्यक्ष कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशन