कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन चालविण्याचा परवाना (लायसेन्स) देण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी ५३ जणांना कायम परवाना, तर १९ जणांना शिकाऊ परवाना देण्यात आला.जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार मागील आठवड्यापासून नवीन वाहन नोंदणी, पासिंग, कर्ज बोजा चढविणे, उतरविणे, कर भरणा, आदी कामकाज सोशल डिस्टन्स पाळून सुरू करण्यात आले. गेल्या १९ मार्चपासून प्रलंबित असलेले वाहन चालविण्याचे परवाने वाहन चालविण्याची चाचणी देऊन देण्यास सुरुवात केली.
पहिल्याच दिवशी पुनर्वेळ घेतलेल्या ५३ जणांना हा परवाना देण्यात आला. शिकाऊ परवान्यासाठी २० जणांनी परीक्षा दिली होती; मात्र त्यात १९ जण उत्तीर्ण झाले. त्यांना परवाना देण्यात आला. पुनर्वेळ देण्यात आलेल्या उमेदवारांना त्यांच्या मोबाईलवर वेळ आणि तारीख संदेशाद्वारे सारथी ४ या संगणकीय प्रणालीतून पाठविण्यात आली आहे.
हे पुनर्वेळ परवाने देण्याचे कामकाज सोमवार (दि. २२ जून) ते ३ ऑगस्ट दरम्यान सुरू राहणार आहे. त्यानंतर राज्य शासनाचा पुढील आदेश आल्यानंतर नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यानुसार तारीख आणि वेळ कळविली जाणार आहे.