संजय पाटील - सरूड वधू-वरांना साताजन्माचे जोडीदार बनण्याचा कार्यक्रम म्हणजे लग्न समारंभ. नववधू-वर या समारंभात लग्नाच्या बेडीत अडकून जन्मभर एकमेकांचे सहचारी बनतात. लग्न समारंभातील हळदीपासून ते वराती पर्यंतचा प्रत्येक क्षण हा मंगलमय व पवित्र; मात्र हल्लीच्या आधुनिक जमान्यात अनेक लग्न समारंभात युवकांकडून लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात होणाऱ्या हुल्लडबाजीच्या कृत्यांनी हे पवित्र क्षण पायदळी तुडवले जाऊन लग्नाचा खेळ होत आहे. भटजी व नवरदेवावर उत्साही युवकांकडून अक्षतांचा अक्षरश: मारा होतो. या प्रकारामुळे बुजूर्ग मंडळींतून नाराजी व्यक्त होत आहे.प्रत्येकाच्या जीवनात लग्न समारंभ म्हणजे लाखमोलाचा क्षण. प्रत्येक पवित्र क्षणांनी नवरी-नवऱ्याला मिळत असते, ते दोघेही एकमेकांचा स्वीकार उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने करत असतात. पूर्वी एका दिवसापेक्षा जास्त काळ चालणाऱ्या या समारंभात किती गोड आणि मंगलमय प्रसन्न व पवित्र वातावरण असायचे; पण सध्याच्या काळात लग्न समारंभातील पवित्र हरवायला लागले आहे.सध्या सर्रास लग्न समारंभात हुल्लडबाजीचे प्रकार पाहावयास मिळत आहे. ज्या क्षणांनी वधू-वरांची लग्नगाठ बांधली जाते, त्या क्षणांच्या वेळीच युवकांकडून (वरदावळे) अशोभनीय वर्तन होताना दिसत आहे.१ मंगलाष्टका सुरू असतानाच अधूनमधून भटजी व नवरदेवावर अक्षतांचा मारा केला जातो. शेवटची मंगलाष्टका संपल्यावर उडविले जाणारे सुगंधी द्रव्याच्या (स्प्रे)वेळी भटजीला ‘टार्गेट’ केले जाते. शेवटी या स्प्रे-पासून बचाव करण्यासाठी भटजीला पवित्र आंतरपाटाचा आधार घ्यावा लागत आहे. काही भटजींना तर शेवटची अक्षता संपली की ताबडतोब लग्नाच्या व्यासपीठावरुन काही क्षणासाठी बाजूला पळ काढावा लागत आहे.२ अक्षता संपल्यानंतर नव वधू-वर एकमेकांच्या गळ्यात हार घालून एकमेकांचे जन्माचे जोडीदार म्हणून स्वीकार करतात. हार घालण्याच्या या कार्यक्रमाचा पुरता ‘खेळ’ झाला आहे. अनेक लग्नसमारंभात हार घालतेवेळी नवरी व नवऱ्याला उचलून घेऊन पवित्र हार एकमेकांच्या गळ्यात अक्षरश: फेकून घातले जात आहेत. नवरीच्या करवल्या व नवऱ्याचे वरदावळे यांच्याकडून अनेकवेळा अशोभनीय वर्तन होत आहे.३ लग्नाचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे वरात. या कार्यक्रमाचा तर अलीकडच्या काळात ‘तमाशाच’ झाला आहे. एकंदरीत अलीकडे अनेक लग्नसमारंभात होणाऱ्या हुल्लडबाजीचे प्रकार पाहून जुनी-जाणती माणसे प्रचंड नाराजी व्यक्त करत असून युवकवर्गाने कार्यक्रमाचे महत्त्व जाणून आपले वर्तन योग्य ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
हुल्लडबाजीने लग्न समारंभातील पवित्रता हरवतेय
By admin | Published: March 18, 2015 9:57 PM