कोल्हापूर : गेले दोन दिवस पावसाचा काहीसा ओसरलेला जोर आज, मंगळवारी पुन्हा वाढला. सकाळपासून जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर असल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. राधानगरी ६९, तर वारणा धरण ५७ टक्के भरले आहे. दूधगंगेच्या पाणीपातळीही वाढ झालेली आहे. सकाळपासून जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, चंदगड, शाहूवाडी तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू असून, नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेले दोन दिवस पाऊस कमी असल्याने नद्यांची पातळी कमी झाली होती, पण पावसाने जोर पकडल्याने त्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. धरणक्षेत्रात सरासरी ७५ मिलिमीटर पाऊस झाल्याने पातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरण ६९ टक्के, वारणा ५७, तर काळम्मावाडी ४२ टक्के भरले आहे. त्याचबरोबर इतर धरणांची पातळीही वाढलेली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३१.९१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. चंदगड व राधानगरी तालुक्यांत ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पंचगंगेची पातळी काल, सोमवारी सायंकाळी कमी झाली होती; पण आज ती ३३.४ फुटांवर आली. अद्याप २८ बंधारे पाण्याखाली असून १५ मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. ( प्रतिनिधी)‘राधानगरी’तून वीजनिर्मितीसाठी पाणी सोडलराधानगरी : राधानगरी परिसरात आज, मंगळवार सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. धरणक्षेत्रांत पाऊस सुरू असल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरणक्षेत्रात आज सकाळी १०९ मिलिमीटर व एकूण १८३८ मिलिमीटर पाऊस झाला. येथील मोहिते कंपनीच्या वीजनिर्मिती प्रकल्पातून काल, सोमवारी सकाळपासून वीजनिर्मिती सुरू करण्यात आली. यासाठी दोनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज, मंगळवारी सायंकाळी पाच वाजता धरणाची पाणीपातळी ३३२.५५ फूट झाली असून, पाणीसाठा ५.८१ टीएमसी इतका आहे. दाजीपूर येथे घेण्यात येणाऱ्या नोंदीनुसार आज ७८.०६ मिलिमीटर व एकूण २१८१.०८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तुळशी धरणक्षेत्रात आज ५३ व एकूण ११५९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात १.८०० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. (प्रतिनिधी)वारणा नदी पात्राबाहेरसांगली : जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ वगळता जिल्ह्याच्या उर्वरित भागात आज, मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे वारणेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिराळा तालुक्यातील अंत्री बुद्रुक येथे दुमजली इमारतीची भिंत कोसळली. तालुक्यातील नदीकाठाचे काही रस्ते व पूलही बंद झाले आहेत. सांगली व मिरज शहरात पाणी साचून राहिले आहे.
जिल्ह्यात धुवाधार!--पावसाचा जोर वाढला :
By admin | Published: July 23, 2014 12:40 AM