कोल्हापूर : दसरा चौक परिसरात महाविद्यालयीन तरुणीला अडवून असभ्य वर्तन करणारा पंकज शंकर मोरे (रा. उंड्री, ता. पन्हाळा) हा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच मोबाईल बंद करून पसार झाला आहे. तो शिवाजी विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलचा अध्यक्ष आहे. एम. ए. १ (इंग्रजी) विषयाच्या प्रवेशासाठी बाह्ण विद्यार्थिनीचा संबंधित कागदपत्रांवरील मोबाईल क्रमांक मिळवून संशयित मोरे हा सतत सतावत होता. २३ जानेवारीला ती दसरा चौकातील महाविद्यालयात जाताना तिला अडवून त्याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी तिच्या मित्राने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही त्याने धमकाविले. तरुणीने मोरे याच्याकडून आपल्या जिवितास धोका आहे, अशी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मोरे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच मोरे मोबाईल बंद ठेवून पसार झाला. लक्ष्मीपुरी पोलीस गेली दोन दिवस त्याच्या घरी जाऊन शोध घेत आहेत परंतु तो मिळाला नाही. त्याच्या नातेवाईक व मित्रपरिवारांकडेही पोलीस चौकशी करत आहेत. उंड्री गावच्या पोलीस पाटलांवर तो गावात आला की पोलिसांना कळविण्यास सांगितले आहे. शनिवार आणि रविवार दोन दिवस न्यायालयास सुटी असल्याने तो पसार झाल्याची शक्यता आहे. त्याच्याकडून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
तरुणीशी असभ्य वर्तन; आरोपी पसार
By admin | Published: February 16, 2015 12:24 AM