सुशांत कुंकळयेकर - मडगाव --कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अटक केलेला सनातनचा साधक समीर गायकवाड आणि मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार संशयित रुद्र पाटील या दोघांमध्ये व्यावसायिक संबंधही होते. २00६ पर्यंत रुद्र व समीर सांगलीत भागीदारीने मोबाईलचे दुकान चालवीत होते. रुद्र या हत्या प्रकरणाचा मास्टरमार्इंड असण्याची शक्यता पडताळून पाहत आहेत.मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर रुद्र पाटील फरार झाल्यानंतर समीरचीही एनआयएने चौकशी केली. या चौकशीमुळे सांगलीत समीरची काहीशी बदनामी झाली. त्यामुळेच त्याला दुकान बंद करावे लागले. ते बंद केल्यानंतर रोजीरोटीचा कोणताही मार्ग नसल्यामुळे सनातनचे काम त्याने सुरू केले, असे सनातनशी संबंध असलेले मुंबईचे वकील अॅड. संजीव पुनाळेकर यांनी सांगितले.मार्च २0११ पासून समीर सनातनचा धर्मरथ चालविण्याच्या कामावर होता. पानसरेंच्या हत्येनंतर त्याने कित्येकांशी फोनवरून संपर्क साधला होता. या संपर्कावरूनच पोलीस समीरपर्यंत पोहोचले. रुद्र पाटील याच्याकडे व्यावसायिक संबंध असल्यामुळेच पोलिसांची समीरवर नजर होती. पुनाळेकर म्हणाले, २00९ मध्ये मडगावात बॉम्बस्फोट झाल्यानंतर चौकशी करणाऱ्या एसआयटीने तसेच एनआयएने समीरची चौकशी केली होती. त्यावेळी सांगली येथील त्याच्या दुकानावरही पोलीस आले होते. यामुळेच त्याची बदनामी झाली होती. यानंतर दुकानमालकाने समीरकडून दुकान काढून घेतल्याने तो बेरोजगार झाला. पुनाळेकरांच्या म्हणण्याप्रमाणे समीरला फोन वारंवार बदलायची सवय होती. त्याशिवाय त्याचा स्वभाव थापाड्या होता. गोष्टी वाढवून सांगायची त्याला सवय होती. यामुळे तो गोत्यात आला. घमेंडखोर स्वभावानुसार तो बरळल्यामुळेच पोलिसांच्या जाळ्यात सापडला.काय म्हणते सनातन ?‘पोलिसांनी सनातनचे निष्पाप साधक समीर गायकवाड याला अटक केली आहे. आध्यात्मिक दृष्टीने सात्विक व सज्जन लोकांचा छळ करणे हे तामसी प्रवृत्तीचे लक्षण आहे. ही प्रवृत्ती साधना करूनच नष्ट होते. वाल्याचे वाल्मीकी ऋषी केवळ साधना करून झाले. या आध्यात्मिक सिद्धांतावर आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून सनातन अनेक वृत्तांत ‘आगामी हिंदू राष्ट्रात कठोर साधनेची शिक्षा करण्यात येईल’ असे म्हणते. येथे शिक्षा हा शब्द प्रातिनिधिक असून, साधनेद्वारे व्यक्तीचे पारमार्थिक कल्याण व्हावे, असा व्यापक दृष्टिकोन यामागे आहे’.
रुद्रशी समीरचे व्यावसायिकही संबंध
By admin | Published: September 21, 2015 12:30 AM