आटपाडी : पलूस येथील केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयात घडलेल्या जीवघेण्या रॅगिंगची पोलिसांकडून होत असलेली चौकशी संशयास्पद ठरली आहे. ‘होय, सहा मुले मला लावणीवर नाचायला लावायची, स्लो मोशन करायला लावायची, पण मला नाचायला आवडते,’ असा रॅगिंगच्या छळाला बळी पडलेल्या आणि सध्या तिथे राहात असलेल्या विद्यार्थ्यांचा जबाब पोलिसांनी नोंदविला आहे. हे प्रकरण दडपण्याचा पोलीस प्रयत्न करत असून या प्रकरणाची चौकशी सामाजिक कार्यकर्त्यांच्या साक्षीने करावी, अशी मागणी या विद्यालयात मृत्यू पावलेल्या सचिन या विद्यार्थ्याचे वडील लालासाहेब जावीर यांनी केली आहे.दि. ५ डिसेंबर रोजी या विद्यालयात दहावीत शिकणाऱ्या सचिन लालासाहेब जावीर (१५, रा. गोमेवाडी, ता. आटपाडी) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या विद्यालयात आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांवर रॅगिंग होत असल्याच्या त्याच्या पत्रासह लालासाहेब जावीर यांनी पलूस पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार विद्यालयाचे प्राचार्य अशोक साळी, हाऊस मास्टर बाळासाहेब खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दोघांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.या प्रकरणाचा तपास संशयास्पद असून गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप लालासाहेब जावीर यांच्यासह ग्रामस्थांनी केला. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांना भेटून त्यांनी तपासाबाबत माहिती घेतली. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे अजब जबाब पोलिसांनी नोंदवून घेतल्याचे स्पष्ट झाले.‘सहा मुले दररोज एका विद्यार्थ्याला झोपेतून उठवून लावणीवर नाचायला लावतात. त्यामध्ये ‘स्लो मोशन’ करायला लावतात. रात्री दहा वाजता त्यातलाच एक विद्यार्थी स्टडी रूममधून बाहेर आल्यानंतर लावणीवर नाचायला लागलेल्या ‘त्या’ विद्यार्थ्याला ‘टाईमपास’ म्हणून झोपेतून उठवून दररोज मारहाण करतो.’ यावर पोलिसांना कसा काय त्या मुलाने ‘मला नाचायला आवडते’ असा जबाब दिला?, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. याशिवाय नाष्टा करण्यासाठी हाऊसमध्ये नववीच्या विद्यार्थ्यांनी जावे, अन्यथा तो दरवाजात काठी घेऊन उभा राहतो आणि उशिरा येणाऱ्या प्रत्येक नववीच्या विद्यार्थ्याला मारतो, असा त्या विद्यार्थ्याच्या नावासह सचिनच्या चिठ्ठीत उल्लेख आहे. पोलिसांनी जो विद्यार्थी जेवणातील वाटाणे विद्यार्थ्यांना फेकून मारतो आणि मुलांचे कपडे घाण करतो, त्या विद्यार्थ्याचा जबाब, ‘मी खादाड आहे,’ असा नोंदवला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी घाई-घाईने पंचनामा केला, हे स्पष्ट होत असून हे विद्यालय केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप लालासाहेब जावीर यांनी केला आहे. (वार्ताहर)पोलिसांचा तपास की फार्स?डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. ६ डिसेंबर रोजी सचिन विद्यालयात भाषण करणार होता. त्याची तयारी शिक्षकांनी करवून घेतली होती. त्याच्या आदल्यादिवशी दि. ५ डिसेंबरला ५५ किलो वजन आणि ५ फूट ५ इंच उंची असलेल्या या विद्यार्थ्याने एवढ्याशा झाडाला गळफास लावून आत्महत्या कशी केली? यापूर्वीही तीन विद्यार्थ्यांनी मृत्यूला का कवटाळले? असे प्रश्न उपस्थित होत असून, याची चौकशी करण्याऐवजी पोलीस केवळ ‘रेकॉर्ड’ तयार करण्यात मग्न आहेत, अशी चर्चा सुरू आहे.
पलूसमधील रॅगिंगची चौकशी संशयास्पद
By admin | Published: December 26, 2014 10:49 PM