रुकडी माणगाव : रुकडी येथील रेल्वे विभागाने नागरिकांना येणे-जाण्यासाठी बांधलेला परिख पूल बनला असून पहिला वादळी पावसात तुडूंब भरल्याने नागरिकांना येणे-जाण्यासाठी अतिग्रेमार्गे रूकडी असा प्रवास करावा लागला हा प्रवास म्हणजे वाईमार्गे सातारा याप्रमाणे झाला आहे.
रेल्वे विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने जुना फाटक मार्ग बंद करून नवीन बांधण्यात आलेला भुयारी मार्ग तयार केला आहे. हा मार्ग कोल्हापूर व सांगली मार्गास जाण्याचा नजीकचा मार्ग असून या मार्गावरून बरेच प्रवासी प्रवास करतात. हा मार्ग दोन्ही बाजूंकडून निमुळते व मध्येच खोलगट झाला असून यामुळे पावसाचे पाणी थेट एकत्र जमते त्यातच या मार्गानजीक असलेल्या वसाहतीमधील सांडपाणी थेट या मार्गाताच जमत असल्याने हा मार्ग शेवाळलाही आहे.
दोन दिवस झालेल्या वादळी पावसाने या मार्गात दीड फूट पाणी साचल्याने सोमवार (दि.२४) पासून दुचाकी वाहनाचा प्रवास बंद झाला. त्यामुळे रूकडीच्या दक्षिण व उत्तर बाजूस राहणारे नागरिकांचे दळणवळण थांबले.
दरम्यान, खोलगट भागात साचलेले पाणी रेल्वे विभागाने यंत्राच्या साहाय्याने उपसा करून मार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न करत होते. वादळी पावसातच हा मार्ग बंद झाल्याने पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास कसा करावयाचा, हा प्रश्न नागरिकांना पडला असून ग्रामपंचायत प्रशासनाने रेल्वे प्रशासनाशी संपर्क करून या मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
फोटो : रुकडी येथील रेल्वेेफाटकाजवळील भुुयार मार्गावर पाणी साचल्याने अशी कसरत करून मार्ग काढावा लागतोय. (छाया : सचिन पाटील)