कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी शुक्रवारी सत्तारूढ आघाडीची दोन तास बैठक झाली असली तरी जागांचे कोडे सुटलेले नाही. इतर मागासवर्गीय (ओबीसी) जागेवर जनसुराज्यने दावा केला आहे, तर काँग्रेस ही जागा सोडण्यास तयार नसल्याने पॅनलचे घोडे अडले आहे.
जिल्हा बँकेच्या पॅनलसाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय काेरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांची शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यामध्ये नऊपैकी सात जागांवरील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ‘ओबीसी’ व महिला गटातील एका जागेवर पेच कायम आहे.
मागील निवडणुकीत नऊपैकी शिवसेना एक, राष्ट्रवादी तीन, काँग्रेस चार व एक जनसुराज्य अशी जागांची वाटणी झाली आहे. त्याप्रमाणेच जागा वाटपाचे सूत्र कायम ठेवण्याचा आग्रह काँग्रेसचा आहे. मागील निवडणुकीत पतसंस्थेची जागा जनसुराज्य पक्षाला दिली होती. मात्र, आमदार कोरे यांनीच आमदार प्रकाश आवाडे यांना या गटातून उमेदवारी दिली. त्यामुळे कोरे यांनी ‘ओबीसी’च्या जागेवर दावा सांगितला आहे. ही जागा सोडण्यास काँग्रेसने नकार दिला आहे. यावरूनच शुक्रवारच्या बैठकीत जागांचे कोडे सुटलेले नाही.
शिवसेनेला हव्यात पाच जागा
शिवसेनेला संजय मंडलिक, निवेदिता माने यांच्यासह आणखी तीन जागा हव्या आहेत. शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी खासदार संजय मंडलिक यांना फोन करून आग्रह करण्यास सांगितला. त्याप्रमाणे मंडलिक यांनी बैठकीत आग्रह धरल्याचे समजते.
इच्छुकांची शासकीय विश्रामगृह परिसरात घालमेल
शुक्रवारी पॅनलमधील २१ पैकी बहुतांशी जागांवरील उमेदवार निश्चित करण्यात आले. त्यामुळे इच्छुक मोठ्या संख्येने विश्रामगृह परिसरात होते. आत चर्चा सुरू असताना बाहेर मात्र त्यांची घालमेल सुरू होती.
घोरपडे, साळुंखे, सविता पाटील यांची नावे चर्चेत
महिला गटातील दुसरी जागा काँग्रेसला जाणार हे जवळपास निश्चित आहे. येथून पालकमंत्री सतेज पाटील समर्थक स्मिता गवळी, वैशाली घोरपडे तर पी. एन. पाटील समर्थक उदयानी साळुंखे, श्रुतिका काटकर व सविता विश्वनाथ पाटील यांच्यासह रेखा सुरेश कुराडे हे इच्छुक आहेत. एकूण काँग्रेस अंतर्गत हालचाली पाहता घोरपडे, साळुंखे, सविता पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
आतापर्यंत आठ जणांची माघार
माघारीसाठी मंगळवार (दि. २१) पर्यंत मुदत आहे. त्यामुळे माघार संथ गतीने सुरू आहे. शुक्रवारी मुकुंद देसाई यांनी आजरा विकास संस्था गटातून माघार घेतली. आतापर्यंत आठ जणांनीची माघार घेतली आहे.
आजच्या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाली. रविवारी पॅनलला अंतिम रूप देऊन सोमवारी सकाळी पॅनलची घोषणा करणार आहे. शिवसेनेने पाच जागा मागितल्या असल्या तरी अडचणीही आहेत. - हसन मुश्रीफ (ग्रामविकासमंत्री)