इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या सभेत सन २०२१-२२ सालाचे ४३७ कोटी ३२ लाख ५२ हजार ७७८ रुपये जमाखर्चाचे आणि ८५ कोटी ६७ लाख ४१ हजार ५६७ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक दीड तासाच्या चर्चेनंतर बहुमताने मंजूर केले. गतवर्षीच्या तुलनेत कमी रकमेचे अंदाजपत्रक सादर करण्यात आल्याने विरोधकांनी शहर प्रगतीकडे चालले आहे की, अधोगतीकडे असा सवाल करत सत्ताधाºयांना धारेवर धरले.
नगरपालिकेच्या राजीव गांधी भवनमध्ये नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक अंदाजपत्रक व विविध ८३ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यामध्ये सन २०२०-२१ चे दुरुस्त आणि २०२१-२२चे वार्षिक अंदाजपत्रक मांडण्यात आले. त्यावर चर्चा करताना नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांनी, गेल्या वर्षी ५९० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता. तो कमी करून यंदा ४३७ कोटींवर कसा आला, कोणत्या बाबी यामध्ये कमी झाल्या अथवा वगळल्या, जमेच्या बाजूला निधी किती शिल्लक आहे, याचा अभ्यास केलेला नाही. त्यामुळे खर्चाच्या बाजूला अधिक निधीची तरतूद दिसते. उत्पन्न वाढीचे उपाय सूचविण्यात आले नाहीत. खासदार-आमदार यांच्या निधीतील कामांसाठी हिस्स्याची तरतूद नाही, अशा कमतरता मांडल्या.
नगरसेवक शशांक बावचकर यांनी हा अर्थसंकल्प बोगस व फुगीर आकडेवारीचा खेळ असल्याचा आरोप केला. त्यामध्ये नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश नाही. नगरपालिकेत तीन पक्षांची सत्ता असताना अभ्यासपूर्ण अर्थसंकल्प सादर करता आला नाही. स्थायी समितीने सुचविलेल्या अंदाजपत्रकात तब्बल ३२.७६ कोटींची वाढ केली आहे. सूळकूड पाणीपुरवठा योजनेसाठी तरतूद नाही, अशा त्रुटी मांडल्या.
त्यावर उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी हा अर्थसंकल्प शहराच्या विकासाला गती देणारा व सर्वसामान्य जनतेवर कोणत्याही प्रकारची करवाढ न लादणारा असल्याचे सांगितले. तसेच नावीन्यपूर्ण योजना आखण्यात येणार असून, मोठ्या अनुदानाची गरज असल्याने त्यासाठी विविध हेडखाली अनुदानाची तरतूद केल्याचे सांगून एकमताने मंजुरी देण्याची विनंती केली. त्यावर दीड तास चर्चा झाल्यानंतर हा विषय मतदानाला घेण्यात आला. त्यावर २९ विरुद्ध १३ मतदान होऊन सत्ताधारी पक्षाने बहुमताने विषय मंजूर केला. यावेळी तीन नगरसेविका तटस्थ राहिल्या. चर्चेत मदन कारंडे, सागर चाळके, सुनील पाटील, अजित जाधव, राजू बोंद्रे, दीपक सुर्वे आदींनी भाग घेतला.
फोटो ओळी
२६०२२०२१-आयसीएच-०८
इचलकरंजी नगरपालिका सर्वसाधारण सभेत वार्षिक अंदाजपत्रकावर उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक सागर चाळके व शशांक बावचकर यांनी मते व्यक्त केली.
छाया-उत्तम पाटील