सुहास जाधव - पेठवडगाव पालिका पोटनिवडणुकीत सत्ताधारी यादव पॅनेलच्या उमेदवार विजयादेवी यादव यांनी बाजी मारली असली तरी हा निकाल सत्ताधारी पक्षाला आत्मचिंतन करायला लावणारा; तर विरोधकांचा आत्मविश्वास वाढविणारा ठरला आहे. एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत संघटित विरोधकांनी निवडणूक अंतिम टप्प्यात चुरशीची केली होती. त्यांचा निसटता पराभवही त्यांना उभारी देणारा ठरला आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने २०१६ मध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीची रंगीत तालीमच ठरली आहे.पालिका पोटनिवडणुकीत जरी सत्ताधारी यादव पॅनेलचा विजय झाला असलातरी त्यांचे मताधिक्य पाहता या निकालाचा बोध यादव गटाने घेण्याची आवश्यकता आहे. या गटात श्रेयवादावरून जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू असते. चार वर्षांत केलेल्या विकासकामांचे मार्केटिंग करण्यास ते कमी पडले, हे वास्तव आहे.यादव गटात नवीन सक्रिय झालेले कार्यकर्ते मतदार व कार्यकर्त्यांना नेतृत्वापर्यंत पोहोचू देत नाहीत. तसेच सर्व काही ठीकठाक सुरू आहे, याचा अभास निर्माण केल्याने याचाही फटका या गटाला बसला आहे.सुरुवातीपासूनच अनेक कारणांनी गाजलेली ही पोटनिवडणूक मतदार यादी हरकती, विरोधकांचे एकत्रित संघटन, कार्यकर्त्यांमध्ये असणारा असमन्वयपणा, आदी बऱ्याच बाबी घडल्याने विरोधकांच्या पथ्यावर पडली. चावडी व जैन बस्ती केंद्रात झालेले मतदान सत्ताधारी यादव गटाला दिलासा देणारे ठरले, तर विरोधकांना लक्ष्मी सेवा सोसायटी व कन्या विद्यामंदिर केंद्रात झालेले मतदान मताधिक्य वाढविण्याच्या फायद्याचे ठरले. गेल्यावेळच्या पोटनिवडणुकीचा अनुभव पाहता यादव गटाविरुद्ध एकसंघ राहिल्याशिवाय टिकाव लागणार नाही, हे ओळखून यादव विरोधी सर्व आघाड्या एकत्रित आल्या. त्यास यादव गटातील नाराजांची मदत लाभली. मतदानादिवशी एका गटाने विनाकारण दहशतीचा रंग दाखविला. त्याचा फटकाही विरोधकांना बसला. तसेच विरोधी गटाने तुल्यबळ उमेदवार दिला असता तर निकालाचे चित्र वेगळे दिसले असते.नागरिकांकडून विकासाची अपेक्षाशांतताप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात या पोटनिवडणुकीत वर्चस्ववादामुळे वेगळाच रंग चढत आहे. निकालानंतरही एकमेकांविरुद्ध तक्रारीचे सत्र सुरू आहे. राजकारणासाठी नागरिकांना वेठीस धरू नये, हिच सुज्ञ नागरिकांची अपेक्षा आहे. शहराच्या विकासासाठी सर्वांनी योगदान द्यावे.
सत्ताधारी काटावर; विरोधकांना उभारी
By admin | Published: April 26, 2015 9:56 PM