लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व आमदार पी.एन. पाटील यांच्यात जिल्हा बँकेत बैठक झाली. यामध्ये सत्तारूढ गटाने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांना तीन जागा देण्याची तयारी दाखवल्याचे समजते. मात्र मुंबईला निघालो आहे, दोन दिवसात आपणास फोन करून सांगतो, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
‘गोकुळ’ची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्तारूढ गटाचे प्रयत्न आहेत. किमान मंत्री मुश्रीफ यांनी आपल्यासोबत राहावे, असा प्रयत्न आहे. त्यातूनच गेल्या आठवड्यात मुंबईत हसन मुश्रीफ, सतेज पाटील व पी.एन. पाटील यांची बैठक झाली होती. मात्र संघाची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर पुन्हा बसण्याचे नेत्यांमध्ये ठरले होते. त्यानुसार रविवारी सकाळी जिल्हा बँकेत मंत्री मुश्रीफ व आमदार पाटील यांच्यात चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी आपापले म्हणणे स्पष्ट केले. जागांबाबत एकमेकांनी विचारले, मात्र तुम्ही सांगा, तुम्ही सांगा एवढ्यावरच चर्चा आडली. महाविकास आघाडीबाबत चर्चा न करता आपण व पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोबत यावे, असे बैठकीत सुचवल्याचे समजते. यामध्ये मंत्री मुश्रीफ यांना दोन तर मंत्री पाटील यांना एक अशा तीन जागा देण्याची तयारी सत्तारूढ गटाने दाखवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मंत्री मुश्रीफ यांनी मात्र आपण दोन दिवसात फोन करून सांगतो, असे सांगितले.
एकीकडे प्रचार, दुसरीकडे तडजोड
सत्तारूढ व विरोधकांनी ठरावधारकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. व्यक्तिगत भेट घेऊन आपापली भूमिका मांडून निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकला असताना दुसऱ्या बाजूला तडजोड सुरू ठेवण्याची खेळी सुरू आहे.