लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक स्थगितीसाठी सत्तारूढ गट सर्वेाच्च न्यायालयात गेला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अशा वातावरणात सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या असताना केवळ ‘गोकुळ’ची निवडणूकच का घेतली जाते, ती स्थगित करावी, अशी मागणी सत्तारूढ गटाच्या वतीने न्यायालयात करण्यात आल्याचे समजते. उद्या, मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
‘गोकुळ’च्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली आहे. मात्र, कोरोनामुळे सर्वच संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. निवडणुका लांबलेल्या काळात सत्तारूढ गटात अंतर्गत धूसफूस वाढत गेली, याचा अंदाज नेत्यांना आल्याने कोरोनाचा आधार घेऊन निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न राहिला. काही संचालकांनी तर निवडणुका आणखी वर्षभर पुढे जाव्यात यासाठी देवच पाण्यात घातले होते. उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने प्रक्रिया सुरू झाली. मात्र, याविरोधातही सत्तारूढ गट न्यायालयात गेला. न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले, त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूकही झाली. येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. तोपर्यंत निवडणुकीला स्थगिती द्यावी,यासाठी सत्तारूढ गट सर्वेाच्च न्यायालयात गेला आहे. यावर न्यायालय नेमके काय मत नोंदवते, याकडे सगळ्या सहकार क्षेत्राच्या नजरा लागल्या आहेत.
सत्तारूढ गट निवडणुकीला घाबरतो का
गेली तीस-चाळीस वर्षे ‘गोकुळ’वर एकहाती सत्ता असल्याने प्रत्येक पंचवार्षिकमध्ये सत्तारूढ गट केव्हाही सज्ज असायचा. मात्र, संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच बचावात्मक भूमिका घेतली आहे. सत्ता राखताना मागील निवडणुकीत झालेली दमछाक, मल्टिस्टेट व नोकरभरतीमुळे संस्था प्रतिनिधींच्या मनात असलेला राग व त्यातच सत्तारूढ गटाला पडलेल्या खिंडार, या सगळ्यांमुळे सत्तारूढ गटाला आताच निवडणुका नको आहेत. त्यामुळे कोरोनाच्या आडून निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संस्था प्रतिनिधींमध्ये चर्चा आहे.