कोल्हापूर : वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलत सोमवारी दिवसभर जिल्ह्यासह शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसत्र राबविले. पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरलेला पाहून वाहनचालकांचे धाबे दणाणले. वाहतूक शाखा व पोलिस यांनी संयुक्तरीत्या राबविलेल्या या कारवाईमध्ये ४७३९ वाहनचालकांवर कारवाई करून ९,४७,५०० हजार रुपये दंडाची रक्कम वसूल केली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे, अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्वत: रस्त्यावर उतरून वाहनचालकांना दणका दिला. ही कारवाई यापुढे कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. उन्हाळी सुटीमुळे शहरात पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने शहरासह जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळी वाहतुकीची कोंडी होत आहे. काही वाहनधारक नियमबाह्य वाहने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार त्यांनी परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यात सोमवारी मोटर व्हेईकल अॅक्टनुसार नियमबाह्य वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिले. त्यानुसार कोल्हापूर शहरात वाहतूक शाखा, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी, करवीर आदी पोलिस ठाण्यातील ३०० कर्मचारी सकाळी नऊच्या सुमारास रस्त्यावर उतरले. अचानक पोलिसांचा फौजफाटा पाहून वाहनचालकांना धडकीच भरली. चौका-चौकांत प्रत्येक दुचाकी, चारचाकी वाहने तपासली जात होती. परवाना नसणे, फिल्मिंग काचा, झेब्रा क्रॉसिंगवर स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, तिब्बल सीट जाणे या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांबरोबरच ‘फॅन्सी’ नंबरप्लेट वाहनांवर लावून बिनदिक्कतपणे वावरणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली. कागदपत्रांची पाहणी करून नियमबाह्य आढळणाऱ्या वाहनचालकांना जाग्यावर २०० ते ५०० रुपये दंडाची पावती दिली जात होती. काही वाहनधारकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पुढल्या चौकात अलगदपणे पोलिसांच्या जाळ्यात सापडत होते. व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, गंगावेश, शिवाजी चौक, मिरजकर तिकटी आदी परिसरात विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक तांबडे, अप्पर पोलिस अधीक्षक शर्मा, करवीर विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रस्त्यावर उतरून कारवाईची पाहणी केली. वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरलेले पाहून पोलिस निरीक्षकांसह कर्मचारी प्रत्येक वाहन तपासून सोडत होते. (प्रतिनिधी)कारवाईची धास्तीग्रामीण भागातून वाहन परवाना नसलेले, फॅन्सी नंबरप्लेट असलेले बहुतांशी वाहनचालक कॉलेज, कामानिमित्त शहरात येत असतात. शहरात वाहनांची तपासणी मोहीम जोरात सुरू असल्याचे समजताच अनेकांनी गावांत फोन करून नातेवाईक, मित्रांना कोल्हापुरात येऊ नका, तपासणी सुरू आहे, असे निरोप दिले. त्यामुळे अनेकजणांनी आखलेले बेत रद्द करत घरीच बसणे पसंत केले. ७२ ठिकाणी कारवाई मोहीम सोमवारी सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ५ ते ८ पर्यंत कावळा नाका, दाभोळकर कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक, व्हीनस कॉर्नर, शिवाजी पुतळा, गंगावेश, रंकाळा टॉवर, संभाजीनगर, सायबर चौक, कसबा बावडा, शिवाजी पुतळा, माऊली पुतळा, दसरा चौक यासह ७२ ठिकाणी वाहनतपासणी मोहीम राबविली. सर्व नागरिक, वाहनचालकांनी वाहन चालविताना विहीत नमुन्यातील मापदंडांप्रमाणे वाहनांची नंबरप्लेट बसवावी. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करू नये, सोबत योग्य ती कागदपत्रे बाळगावीत व कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन यावेळी पोलिसांनी केले. चार-पाचवेळा तपासणीकारवाई एकाचवेळी संपूर्ण जिल्ह्यात राबविल्याने घरातून बाहेर पडलेल्या वाहनचालकाची किमान चार ते पाचवेळा ठिकठिकाणी तपासणी होत होती. त्यामुळे या कारवाईतून बेशिस्त चालविणारा एकही वाहनचालक सुटला नाही. वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत एकाच वेळी वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. यापुढे ही मोहीम कायमस्वरूपी सुरू राहील. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे. - विश्वास नांगरे-पाटील,विशेष पोलिस महानिरीक्षक
नियमांत चालवा, नाहीतर पावती फाडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 1:24 AM