कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या पाचपैकी चार महिला नगरसेवकांची गुरुवारी दुपारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वागतासाठी चांगलीच धावपळ उडाली. एरव्ही नगरसेविका कधीही नेत्यांच्या स्वागतासाठी विश्रामगृहावर हजर नसतात, त्यामुळेच त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत; त्यामुळे एका महापालिकेतील महापौरपद कुणाला द्यावे, यामध्ये ते लक्ष घालण्याची शक्यता फारच धूसर आहे; परंतु तरीही साहेबांच्या स्वागताला आलो नाही, असे होऊ नये म्हणून इच्छुकांनी तासभर आधीच हजेरी लावली. माजी नगरसेवक नंदकुमार मोरे हे पत्नी नगरसेविका सरिता मोरे यांच्यासह तिथे आले होते. नगरसेविका माधवी गवंडी यांच्यासह प्रकाश गवंडी यांचीही धावपळ सुरू होती. अनुराधा खेडकर निवडक महिलांसह तिथे आल्या. पक्षाचे माजी शहराध्यक्ष राजू लाटकर व त्यांच्या पत्नी नगरसेविका सूरमंजिरी लाटकर याही उपस्थित होत्या. नगरसेविका मेघा पाटील तेवढ्या आल्या नव्हत्या.
महापालिकेत दोन्ही काँग्रेसची सत्ता असून महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. आगामी एक वर्षासाठी महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. त्यासाठी पाच नगरसेविका इच्छुक असल्या तरी त्यातही सूरमंजिरी लाटकर व सरिता मोरे यांची नावे स्पर्धेत पुढे आहेत. त्यांतील कुणाला संधी दिली जावी, यासंबंधीचा निर्णय आमदार हसन मुश्रीफ यांच्या पातळीवरच होणार आहे; परंतु पुढच्या दोन-तीन दिवसांत हा विषयही पवार यांच्या कानांवर घातला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच इच्छुक नगरसेविकांनी स्वागताच्या निमित्ताने त्यासाठीची ओळख परेड करून घेतली.