कोल्हापूर: सुनेत्रा पवार यांचे ‘मेरिट काय’ अशी विचारणा करून सुप्रिया सुळे यांनी समस्त महिलांचा अपमान केला असल्याची टीका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली. चाकणकर यांनी शुक्रवारी संध्याकाळी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे उपस्थित होत्या.‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’चे विभागप्रमुख, पत्रकार उपस्थित होते. चाकणकर म्हणाल्या, डोक्यावरून कडबा घेऊन जाणाऱ्या, गोठ्यातलं काम करून घर, शेती सांभाळणाऱ्या महिलांचंही मेरिट असते. तुम्ही कोण ठरवणार मेरिट. तुम्हीही साहेबांची मुलगी म्हणूनच पहिल्यांदा निवडणुकीत उतरला. त्यामुळे सुळे यांनी सुनेत्राताईंच्या मेरिटची विचारणा करणं अपमानास्पद आहे. मोठ्या प्रमाणावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचं, साफसफाईची कामे आणि वृक्षारोपण करण्याचं रेकॉर्ड सुनेत्राताईंच्या नावावर आहे. चार इंग्रजी वाक्य बोलले आणि संसदेत आयपॅड घेऊन गेल्यानंतरच मेरिट असते असे नाही. महिलांचा हा केलेला अपमान मतदानातून आम्ही दाखवून देऊ.
अजित पवारांच्या निर्णयाबद्दल त्या म्हणाल्या, काकांची पुतण्यानं साथ साेडली हे भावनिक वातावरण आता संपलं आहे. आता जनतेला विकासकामं करून दाखवणारा नेता हवाय. त्यामुळे राज्यभरातून आम्हाला पाठिंबा मिळत आहे. प्रत्येक वेळी भाजपसोबत चर्चा करण्यासाठी पाठवायचं आणि नंतर तोंडघशी पाडायचं. यातूनच अजित पवार यांना वेगळा निर्णय घ्यावा लागला. पक्षात महिला जरा स्वकर्तृत्वानं पुढं जायला लागली की डोईजड होतात म्हणून बाजूला करायचं हे अनेक वेळा घडलंय. माझ्या बाबतीत दोन वेळा असंच झालंय.बहिणीबद्दलचं अजित पवार यांचं प्रेम सांगताना त्या म्हणाल्या, विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा नागीण म्हणून उल्लेख केला होता. तेव्हा बहिणीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवतारे यांना ‘तू पुढच्या वेळ निवडून कसा येतोस ते पाहतो’ आणि त्यानंतर त्यांचा पराभवही केला. अशा भावाच्या पत्नीचं तुम्ही ‘मेरिट’ काढता हे योग्य नाही.
घराघरातील संवाद वाढायला हवाएकूणच महिलांविषयक वाढते गुन्हे, मुलींच्या आत्महत्या, घटस्फोट हे सगळे पाहता महाराष्ट्र जेवढा वरून उत्तम, चांगला दिसतो तशी परिस्थिती नाही. मुलामुलींबाबतचे गुन्हे पाहिले असता घराघरातील संवाद वाढण्याची गरज आहे, असे मत चाकणकर यांनी व्यक्त केले.