आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ९ : राधानगरी, गारगोटी परिसरातील ग्रामीण भागाचे सौंदर्य ‘रंगछाया’द्वारे उलगडले आहे. कोल्हापुरातील चित्रकार स्वप्निल पाटील आणि प्रकाशचित्रकार समीर शेलार यांच्या ‘रंगछाया’ या चित्र व प्रकाशचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी येथे झाले.
येथील राजर्षी शाहू स्मारक भवनातील कलादालनात सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आणि यश मेटॅलिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजसी सप्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख म्हणाले, कलाक्षेत्रात शिक्षणाची पदवी नसतानाही स्वप्निल पाटील यांनी चांगल्या पद्धतीने कला विकसित केली आहे. ‘रंगछाया’तून ग्रामीण सौंदर्य त्यांनी आपल्या चित्र, तर समीर शेलार यांनी छायाचित्रांतून उलगडले आहे.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पवार म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूरला एक कलानगरी म्हणून विकसित आणि समृद्ध केले. या समृद्ध कोल्हापूर आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन स्वप्निलने चित्रांतून आणि समीरने छायाचित्रांतून चांगल्या पद्धतीने मांडले आहे. कलामहर्षी बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर यांनी कोल्हापूरला दिलेला कलेचा वारसा वृद्धिंगत करण्याचे काम येथील युवा आणि नवकलाकार, चित्रकार करीत आहेत. करवीरनगरीच्या कलेची उंची ते निश्चितपणे वाढवितील.
कार्यक्रमास चित्रकार संजय शेलार, रवी कारेकर, आदी उपस्थित होते. अवधूत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. दुर्गअभ्यासक भगवान चिले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) ग्रामीण जीवनाचे दर्शन या प्रदर्शनात तैलरंग आणि जलरंगात रेखाटलेल्या १७ चित्रांचा, तर १३ छायाचित्रांचा समावेश आहे. चित्रांमध्ये लहान मुले, प्राणी आणि ग्रामीण जीवनातील विविध क्षण रेखाटले आहेत.
छायाचित्रांतून राधानगरी, गारगोटी परिसरातील ग्रामीण सौंदर्य टिपण्यात आले. हे प्रदर्शन शनिवार (दि. १५) पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सुरू राहणार आहे, अशी माहिती चित्रकार स्वप्निल पाटील यांनी दिली.