जयसिंगपूर : जागेच्या मंजुरीअभावी येथील ग्रामीण रुग्णालय गेल्या वर्षभरापासून कागदावरच राहिले आहे. तालुक्यातील तिसरे ग्रामीण रुग्णालय म्हणून या रुग्णालयाची नोंद होणार असली तरी ‘शासकीय काम अन् सहा महिने थांब’ या प्रचितीचा अनुभव येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतरच जागेचा प्रश्न निकालात निघणार आहे. सध्या जयसिंगपूर येथे कार्यरत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव (ता. शिरोळ) या ठिकाणी स्थलांतरित करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करण्याच्या हालचाली गेल्या वर्षभरापासून सुरू आहेत. सन १९६२ साली जयसिंगपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले होते. या आरोग्य केंद्रामुळे जयसिंगपूरसह परिसरातील रुग्णांची मोठी सोय झाली आहे.सांगली-कोल्हापूर महामार्गावर सार्वजनिक बांधकाम कार्यालयाशेजारी सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अस्तित्वात आहे. सर्व सुविधांयुक्त असे अद्ययावत हे रुग्णालय असून, येथे रुग्णांची मोठी गर्दीे असते. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयासाठी चार कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाल्यानंतर जयसिंगपूर नगरपालिकेकडे जागेसाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, जागा उपलब्ध नसल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या इमारतीजवळील जागेत ग्रामीण रुग्णालय बांधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. गेल्या वर्षभरापासून जिल्हाधिकारी यांच्याकडे जागेचे हस्तांतरण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण रुग्णालयासाठी चार कोटी ५० लाख रुपयांचा नव्याने निधी मंजूर झाल्यामुळे याठिकाणी अस्तित्वात असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव येथे स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उदगाव येथील शशिकला क्षय रुग्णालयामधील चार एकर जागेची प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मागणी करण्यात आली आहे. ही जागा ट्रस्टच्या नावावर असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावावर हस्तांतरित झाल्यानंतर जयसिंगपूर येथे गेल्या ५२ वर्षांपासून सुरू असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी असलेली ही जागा जिल्हाधिकारी यांच्याकडे हस्तांतरित करण्याचे कामही कागदपत्रांअभावी रखडले आहे....तर आरोग्य सुविधा त्वरित मिळतीलशिरोळ तालुक्यात सात प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३३ उपकेंद्रे असून, शिरोळ व दत्तवाड अशी दोन ग्रामीण रुग्णालये आहेत. आता जयसिंगपूर येथे तिसरे ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात येणार असले तरी शासकीय पातळीवर या कामाला गती मिळालेली नाही. यामुळे येथील ग्रामीण रुग्णालय गेल्या वर्षभरापासून कागदावरच राहिले आहे. ग्रामीण रुग्णालयामुळे चांगल्या आरोग्य सुविधा नागरिकांना मिळणार आहेत. मात्र, शासकीय पातळीवर याप्रश्नी उदासीनताच दिसून येत आहे.
ग्रामीण रुग्णालय कागदावरच
By admin | Published: March 22, 2015 10:34 PM