कुरुंदवाड : अकिवाट (ता. शिरोळ) येथे साहित्यप्रेमी विकास मंचच्यावतीने शनिवारी (दि. २) पहिले मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. सकाळी ग्रंथदिंडीनंतर दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सागर चौगुले व सरपंच जयश्री नाईक यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त बाल साहित्यिक शाईकुमार गळतगे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच रामचंद्र चोथे व शशांक चोथे लिखित ‘खिद्रापूरची मंदिरे, भारतीयांची प्राचीन ठेव’ व अशोक गायकवाड यांचे ‘सावरून सांभाळताना’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. परिसंवादात डॉ. राजन गवस यांचे ‘संवाद संपत चालला आहे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारच्या सत्रात सुनंदा शेळके यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन, तर विश्वनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार आहे. येथील विद्यासागर हायस्कूल रोड, बसव मंडप, रावसाहेब गळतगे साहित्यनगरीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचा साहित्यप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यी भाऊसो नाईक व सचिव अशोक गायकवाड यांनी केले आहे. (वार्ताहर)
अकिवाटमध्ये २ मे रोजी ग्रामीण साहित्य संमेलन
By admin | Published: April 26, 2015 11:03 PM