दत्ता बिडकर
हातकणंगले : हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने या संकटातून ग्रामीण भाग सावरत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील ६० गावे आणि ४ नगरपालिका क्षेत्रामध्ये दुसऱ्या लाटेत १११५७ रुग्ण होते. त्यापैकी ८३९३ रुग्ण पूर्ण बरे झाले. आज रोजी ६० ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये १६२९ रुग्ण उपचार घेत आहेत. तर चार नगरपालिका क्षेत्रामध्ये १९० रुग्ण उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेत ४६२ रुग्ण मयत झाले असून, तालुक्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्के इतके आहे. इचलकरंजी, पेठ वडगाव, हुपरी आणि हातकणंगले या शहरी नगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कहर झाला. गावे हॉटस्पाट झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली. मात्र, अनेक गावांनी एकीच्या बळाने कोरोनाला हरवलेचे चित्र आहे.
एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तालुक्यामधील १० गावामध्ये १०० ते १५० रुग्ण होते. त्या गावांनी काटेकोर निर्बध पाळून रुग्णसंख्या २०ते २५ पर्यंत आणली आहे. ६ गावांमध्ये २०० ते ३०० रुग्णसंख्या होती, त्यांनी ती ३० ते ४० पर्यंत खाली आणली आहे. तालुक्यातील रुकडी आणि शिरोली या दोन गावांमध्ये ३०० च्यावर रुग्णसंख्या पोहचली होती. या दोन गावांमध्ये ही रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. तालुक्यातील ६० गावांमध्ये २७२ रुग्णांचा कोरोनाने मूत्यू झाला आहे.
तालुक्यातील इचलकरंजी शहरामध्ये ३४५६ रुग्ण बाधित झाले होते. त्यापैकी २८७७ रुग्ण पूर्ण बरे झाले. तर ४१९ रुग्ण उपचार घेत आहेत. पेठवडगांवमध्ये ५२८ रुग्ण बाधित झाले होते. त्यापैकी ३९६ रुण पूर्ण बरे झाले, तर ११५ रुग्ण उपचार घेत आहेत. येथे १७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. हुपरी शहरामध्ये ३०९ रुग्ण बाधित झाले होते. त्यापैकी २२६ रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. तर ७६ रुग्ण उपचार घेत आहेत. ७ रुग्णांना जीव गमवावा लागला. हातकणंगले शहरामध्ये २३१ रुग्ण बाधित झाले होते. त्यापैकी १६२ रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. ६३ रुग्ण उपचार घेत आहेत. ६ रुग्णांचा मृत्यू झाला.