कोल्हापूर : शिवसेनेच्या तीन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एक अशा चार विषय समिती सभापतींच्या पंधराव्या वित्त आयोगातील कामांच्या मंजुरीबाबतची धावपळ मंगळवारी जिल्हा परिषदेत सुरू होती. बुधवारी आरोग्य आणि महिला, बालकल्याण समितीची सभा होणार आहे.
सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे निश्चित झाले आहेत. त्यानुसार अर्जुन आबिटकर, शशिकांत खोत आणि अमर पाटील हे मंगळवारी दिवसभर याबाबतच्या कामकाजात समन्वय करत होते. या पदाधिकाऱ्यांनी पंधराव्या वित्त आयोगातून जी कामे धरली आहेत त्याला बाधा पोहोचू नये, अशी या चारही पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्यानुसार आबिटकर यांनी या सर्वांशी तसेच त्या त्या विभागांच्या अधिकाऱ्यांशी दिवसभरात चर्चा केली.
उपाध्यक्ष सतीश पाटील यांचा राजीनामा घेण्यासाठी अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे राजीनामा पत्र देण्यात आले. परंतु सर्वच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे शुक्रवारी प्रत्यक्ष घेण्याबाबत आपल्याला सूचना असल्याचे पाटील यांनी सांगितले.
चौकट
पुरस्कार निवडीची गडबड
शाहू पुरस्कार निवड समितीची बैठक बुधवारी हाेणे अपेक्षित असून त्यासाठीही जोडण्या सुरू आहेत. सदस्य, कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देण्यात येणार असून ते शाहू जयंतीच्या आदल्या दिवशी जाहीर केले जातात. सर्वच सहाही पदाधिकारी या प्रक्रियेत सहभागी होणार असून त्याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.