लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊन नंतर सोमवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू झाली. शेती सेवा केंद्रात बियाणे व खते खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाली होती.
कोल्हापूर जिल्ह्यात १५ मे नंतर खरीप पेरणीस सुरुवात होते. चक्रीवादळामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना आता गती आली आहे. लॉकडाऊनमुळे शेती सेवा केंद्र बंद होती. मशागत करुन जमिनी तयार करण्यात आल्या, मात्र बियाणे नसल्याने पेरणी करता आली नव्हती. सोमवारी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन शिथिल करत अत्यावश्यक सेवा सुरु करण्यास परवानगी दिली. सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक वस्तूंची विक्री करता येत आहे. आठ दिवस बियाणे, खते मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे सोमवारी सकाळी सहा वाजताच शेती सेवा केंद्राच्या दारात रांगा लागल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळाले. भात, कडधान्य या बियाण्यांबरोबरच तणनाशक, कीटकनाशक, खतांची मागणी अधिक आहे.
विक्रेत्यांची कसरत
अवघ्या चार तासात शेतकऱ्यांना माल देताना विक्रेत्यांना कसरत करावी लागत होती. वेळेचे बंधन असल्याने अनेक शेतकऱ्यांना बियाणे न मिळाल्याने काही ठिकाणी शेतकरी व विक्रेत्यांमध्ये वाद झाल्याचे समजते.