लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या जोरदार पावसाने खरीप पेरणीसाठी झुंबड उडाली आहे. माळरान, डोंगरमाथ्यावर पेरणीपूर्व मशागत व भात पेरणीस गती आली आहे. भात, सोयाबीन, खरीप ज्वारीसह इतर कडधान्य बियाणे मुबलक प्रमाणात असून, जिल्ह्यासाठी युरियाचा १३९२ टनांचा बफर स्टॉक केला आहे. अमोनियम सल्फेट, डीएपीची काही तालुक्यांत टंचाई आहे.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यात खरिपाच्या धूळवाफ पेरण्या सुरू आहेत. साधारणत: १० टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गुरुवारी जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळला. शिवारात पाणीच पाणी केले. या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीस वेग आला आहे. धूळवाफ पेरणी झालेल्या भात उगवणीस पाऊस पोषक ठरला आहे. पावसामुळे शुक्रवारी पेरण्या काही ठिकाणी खोळंबल्या असल्या तरी माळरान व डोंगरमाथ्यावरील पेरण्यांना वेग आला होता. सकाळपासून ढगाळ वातावरण असले तरी कमालीचा उष्मा जाणवत होता. दुपारनंतर आकाश काहीसे मोकळे झाले असले तरी पावसाचे वातावरण कायम राहिले. माॅन्सून केरळमध्ये दाखल झाला असून, महाराष्ट्रातील वातावरणातही बदल झाला आहे. दोन दिवसांत भुईमूग पेरणीस गती येणार आहे.
भात, सोयाबीन, भुईमूग बियाणे पुरेसे उपलब्ध आहे. युरिया, पोटॅश, सुफला ही खते उपलब्ध आहेत. मात्र, मिरगी डोस म्हणून वापर केला जात असलेले अमोनियमन सल्फेटची मात्र जिल्ह्यात टंचाई आहे.
तालुकानिहाय युरियाचा बफर स्टॉक
तालुका बफरसाठा टन
करवीर ५३०
शिरोळ २५०
हातकणंगले ९८
आजरा १०९
कागल १९४
राधानगरी १५१
पन्हाळा २४
भुदरगड २४
गगनबावडा १२
गडहिंग्लज निरंक
चंदगड निरंक
शाहूवाडी निरंक
बियाण्यांची उपलब्धता-
सोयाबीन - महाबीज : ६९० क्विंटल, खासगी कंपन्या : १२५६ क्विंटल
भात - महाबीज : २८४० क्विंटल, खासगी कंपन्या : ५९३४ क्विंटल
हायब्रीड भात - ६२ क्विंटल
खताची उपलब्धता -
खरिपासाठी एकूण मागणी - १ लाख ९८ हजार टन
उपलब्धता - डीएपी - ५९०७, एसएसपी - ४८८८, एमओपी -५९८२, संयुक्त खते - १२२८०.
फोटो ओळी : कोल्हापूर जिल्ह्यात शुकवारी खरीप पेरणीसाठी धांदल उडाली होती. कात्यायनी परिसरात भात पेरणीत शेतकरी मग्न होते. (फोटो-०४०६२०२१-कोल-खरीप) (छाया- आदित्य वेल्हाळ)